Breaking News

कंटेनरच्या धडकेत दुचाकीचा स्फोट


आडूळ, 11 - भरधाव कंटेनरने दुचाकीला उडवून फरपटत नेल्याने दुचाकीचा स्फोट होऊन उडालेल्या भडक्यात दोनजण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभरूळ (ता. पैठण) येथील बसस्थानकाजवळ रविवारी (ता. 10) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
या अपघातामुळे महामार्गावर तासाभराहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. मिथुन विष्णू राठोड (वय 
18), अभिजित ऊर्फ बबलू अनिल राठोड (17) आणि ऋतिक सुदाम राठोड (22, सर्व रा. थापटी तांडा, ता. पैठण) हे तिघे वर्गमित्र रविवारी दाभरूळ येथे कबड्डी खेळण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. खेळावरून परताना बसस्थानकाजवळ पाचोडहून औरंगाबादकडे भरधाव वेगाने येणार्‍या कंटेनरने (एमएच- 04, जीवाय- 0221) 
दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात कंटनेरच्या खाली अडकून तब्बल 150 ते 200 फुटांपर्यंत 
फरपटत नेल्याने दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल गळती होऊन मोठा स्फोट झाला. यात तिघांपैकी दोघांचा होरपळून मृत्यू झाला, तर ऋतिक राठोड गंभीर जखमी झाला. 
जखमीला 108 वाहनातून औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मिथुन व अभिजित यांचे मृतदेह आडूळ (ता. पैठण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती 
मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान धबडगे, गुलफाम शेख, नामदेव मद्दे, महादेव निकाळजे, सदानंद बनगे, सुधीर वाव्हळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर मृतदेह नेण्यासाठी वाहन व्यवस्था झाली नसल्याने जवळपास दीड तास वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी जवळपास पाच-पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.