Breaking News

मुलींना मारहाण करणार्‍या मद्यपी तरुणांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल


 अहमदनगर । प्रतिनिधी । 06 - बोल्हेगाव परिसरातील एका शाळेच्या स्नेहसंमेलनाला गेलेल्या तीन अल्पवयीन शालेय मुलींना मद्यपान केलेल्या 20 मुलांनी छेडछाड करुन मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेतील तिन्ही मुलींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अखेर चार जणांविरुध्द भादवि 354 (अ), 323, 504, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पिडीत मुलीच्या पालकांनी फिर्याद दिली आहे. 
शनिवारी रात्री बोल्हेगाव परिसरातील एका स्नेहसंमेलनासाठी काही मुली गेल्या होत्या. कार्यक्रमावरुन जात असतांना एका कट्ट्यावर बसलेल्या 20 ते 25 तरुणांनी मुलींना आवाज देऊन थांबविले, मुलींनी दखल न घेता कोणतीही प्रतिक्रीया न दिल्यामुळे मद्यपी तरुणांनी मुलींचा पाठलाग केला. काहींनी मुलींचा हात पकडला. मुलींनी विरोध केला असता नशेत असलेल्या मुलांनी मुलींच्या पोटात मारहाण केली होती ही घटना बोल्हेगाव परिसरातील राघवेंद्र स्वामी माध्यमिक विद्यालयाच्या गेटसमोर शनिवारी रात्री 8.30 वाजता घडली होती. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा झाली. तोफखाना पोलिसांना कळविण्यात आले. मात्र, पोलिसांनी या घटनेची कोणतीच दखल घेतली नाही. वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या नंतर पोलिसानी रुग्णालयात जाऊन जखमी मुलींचा जबाब घेतला. त्यानंतर मुलींच्या पालकांनी फिर्याद दाखल केली.  यंगट गायकवाड, गणेश कोलते, आकाश कोलते, अक्षय शिरसाठ (बोल्हेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचा शोध सुरु केला. यातील काही आरोपींना मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली. या घटनेत 20 ते 22 मुलांनी छेडछाड केल्याचे सांगण्यात आले असले तरी पोलिसांनी फक्त चार जणांवरच गुन्हा दाखल केल्याने पोलिसांच्या भुमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. 
अनेक दिवसापासून शालेय परिसरात अल्पवयीन विद्यार्थींनीची छेडछाड करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, पोलिसांनी नियुक्त केलेले छेडछाड महिला पथक कुठेही कार्यरत असल्याचे दिसत नाही. पोलिस अधिक्षकांनी केलेली घोषणा कित्येक दिवसापासून कागदावरच राहिली आहे.त्यामुळे छेडछाडीचे प्रकार वाढल्याचे दिसून येते.