Breaking News

भाजपला शह देण्याची शिवसेनेकडून तयारी


मुंबई, प्रतिनिधी, दि. 10 - केंद्र,राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपचे पुढचे लक्ष्य आहे मुंबई महापालिकेवर एकहाती सत्तेचे. यासाठी मित्रपक्ष शिवसेनेची सर्व स्तरांवर कोंडी करण्याचे डावपेच केले जात आहेत.
याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी सायंकाळी महापौर बंगल्यात तातडीने आपल्या नगरसेवकांची बैठक घेतली. अतिशय गोपनीय पद्धतीने भाजपच्या रणनीतीचा सामना कसा करायचा याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यासाठी नगरसेवकांना मोबाइल खासगी सचिव आणण्यासही मज्जाव करण्यात आला होता.
मुंबईतील इमारत बांधकामांच्या नियमावली पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहावर झाले. खरे तर हा विषय महापालिकेशी संबंधित असल्याने हा कार्यक्रम महापौर बंगल्यावर होणे अपेक्षित होते. मात्र, पालिका प्रशासनाने शिवसेनेलाच अंधारात ठेवून हा कार्यक्रम उरकला. या कार्यक्रमात बांधकामांविषयीच्या   नियम, अटी कमी करून त्यांची संख्या  वर आणण्यात आणण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. एवढा मोठा निर्णय घेताना शिवसेनेला विचारलेही नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे संतापले आहेत. दहा मंत्री असले तरी सरकारमध्ये शिवसेनेला महत्त्व दिले जात नाही. त्यातच आता महापालिकेतही शिवसेनेला डावलून सरकार निर्णय घेत असल्याकडे नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंचे लक्ष यापूर्वीच वेधले होते. त्यामुळे वेळीच सावध होऊन स्वबळावर पालिकेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरेंनी हालचाली सुरू केल्या आहेत.
बिल्डरांना खुश करण्याचा प्रयत्न
बांधकाम निययमावलीत शिथिलता आणल्यामुळे सध्या बिल्डर लॉबी भाजपवर खुश आहे. पुढील वर्षी होणार्‍या पालिका निवडणुकीत या बिल्डरकडून भाजपला मोठी आर्थिक ताकद मिळू शकते. याशिवाय निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या आयुक्तपदी अजय मेहता यांना आणून प्रशासनावरही सरकारचा अंकुश ठेवण्याची रणनीती मुख्यमंत्र्यांनी आखली आहे.मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही काही महिन्यांपासून मनपा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून थेट शिवसेनेशी पंगा घेणे सुरू केले आहे. तसेच बिगर मराठी वॉर्डात मोर्चेबांधणीही केली आहे. आता भाजपने मराठीबहुल भागांकडे लक्ष केंद्रित केले असून आता सातत्याने तेथे बैठका घेतल्या जात आहेत.