पाणीसाठ्यांचे योग्य नियोजन करा : ग्रामविकास मंत्री
अहमदनगर । प्रतिनिधी । 10 - जलयुक्त अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या तलावांच्या बांधावर वृक्ष लागवड करून तलावात उपलब्ध झालेल्या पाणीसाठयाचे योग्य नियोजन करा, असे आदेश ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणांना दिले.
जिल्हा नियोजन भवनात मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार अभियानातील कामांची आढावा बैठक पार पडली. खा. दिलीप गांधी, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने बैठकीस उपस्थित होते. जिल्ह्यातील 279 गावांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 11 हजार 284 कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी 11 हजार 75 जलसंधारणाची कामे पूर्ण झाली आहेत. सुमारे 132 कोटी रुपये खचरून ही कामे करण्यात आली असून, तलावांत 36 हजार घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाल्याची माहिती बैठकीच्या सुरुवातीला प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांबाबत समाधान व्यक्त करत मुंडे यांनी पावसाचे पाणी अडविणे शक्य आहे. पण, त्याचा वापर योग्य होत नाही, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढील काळात उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तलावांतील पाणी ठिबकव्दारे शेतीला दिल्यास पाण्याची मोठया प्रमाणात बचत होईल. जेणेकरून पाण्याचा योग्य वापर होईल आणि अधिकाधिक शेतकर्यांना त्याचा लाभ घेता येईल, असे आदेश मुंडे यांनी यावेळी दिले. नव्याने खोदण्यात आलेल्या तलावांत गाळ होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तलावांच्या बांधांवर वृक्ष लागवडीचाही कार्यक्रम राबवा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. त्याचबरोबर यापुढील काळात पीक पध्दतीत बदल करण्याबाबत शेतकर्यांत जनजागृती करणे, नवीन पीक पध्दतीबाबत त्यांना माहिती देणे, कमीत- कमी पाण्यात अधिकाधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने शेतकर्यांना मार्गदर्शन करण्याचेही यावेळी सांगण्यात आले.