Breaking News

रोजगार निर्मात्यांची देशाला गरज ः राज्यपाल सी. विद्यासागर राव


 पुणे (प्रतिनिधी) । 11 - भारताने जगाचे नेतृत्व करावे अशी आजच्या घडीला स्थिती आहे. या परिस्थितीत 
वैश्‍विक बाजारपेठ जिंकणार्‍या तरूण उद्योजकांची आपल्याला गरज आहे. भारताला आज रोजगार शोधणार्‍यांपेक्षा रोजगार निर्मात्यांची आवश्यता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या  अविष्कार 2015 परिषदेचे उद्घाटन आज राज्यपालांच्या हस्ते झाले, या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पर्सिस्टंट सिस्टम्सचे 
संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे, विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, 
बी.सी.यु.डी. चे संचालक डॉ. विश्‍वास गायकवाड, रजिस्टार डॉ. नरेंद्र कडू, राज्यातील अन्य विद्यापीठांचे 
कुलगुरू, विविध ज्ञानशाखांचे प्रमुख, प्राध्यापक, अविष्कार मध्ये सहभागी झालेले संशोधक, विद्यार्थी व अन्य 
मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, भारत हा एकेकाळी तत्वज्ञान आणि विज्ञान यात अग्रेसर होता. भारताने जगाला शून्य,  आयुर्वेद आणि योगविद्या दिली. भास्कराचार्याने पृथ्वी सुर्याला किती वेळेत प्रदक्षिणा घालते याचे गणित मांडले. 
भारत हा कल्पनांचा समृध्द असा देश होता. उच्च विद्येमध्ये भारत जगातील प्रभावशाली देश होता. तक्षशिला, 
नालंदा, विक्रमशिला, सोमपूरा आदी ज्ञानविद्यापीठे याची साक्ष आहेत.  भारताची ही बौध्दिक शक्ती पुन्हा प्राप्त 
करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावयाचे आहेत.  राज्यपाल म्हणाले की, भारत हा आज जगातील तरूणांचा देश आहे. ही आपली शक्ती असून उच्च शिक्षण संस्था ही आपली दुसरी शक्ती आहे. 712 विद्यापीठे आणि 36 हजार महाविद्यालये आज देशभर उच्च शिक्षण देत आहेत. तथापि, उच्च शिक्षणातील गुणवत्ता हे आजही आपल्या समोरील आव्हान आहे. जगातील सर्वोत्तम 200 विद्यापीठामध्ये अगदी अलीकडे आपल्या 2 विद्यापीठांनी स्थान पटकाविले आहे. तथापि, महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे जगातील सर्वोत्तम शिक्षण देणा-या होवू शकतील, अशी त्यांच्यामध्ये क्षमता आहे. अश्यावेळी संशोधनाच्या आणि नाविण्यपूर्ण गोष्टी करणारे विद्यार्थींची आपल्याला गरज आहे. यातून आपली विद्यापीठे स्मार्ट विद्यापीठांमध्ये परिवर्तीत होवू शकतात. उद्योगपती होण्यासाठी घराण्याची पार्श्‍वभूमीची आज गरज नाही, आज गरज आहे ती जगाला नवीन कल्पना देण्यासाठी असणारी कल्पकता आणि हिंमत.  अनेक लोक  स्टार्ट-अप संकल्पनेत गुंतवणूक करण्याचे धाडस करीत आहेत. मला दिसत आहे की, भारत स्टार्ट-अप नेशन म्हणून जगातील प्रमुख देश असेल, आणि हे सगळं तरूणांच्या सहभागातून शक्य आहे. तरूणांनी या उत्क्रांतीमध्ये सहभागी होवून इंडियाला एका उच्च स्थानावर नेवून ठेवले  पाहिजे. यावेळी राज्यपालांनी विविध ज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संशोधनाच्या उपकरणे, प्रतिकृती, पोस्टर आदी सादरीकरणाच्या अविष्कार प्रदर्शनाचे उद्घाटन करून पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतूक केले.
भारत सरकारने मेक इन इंडिया, स्वच्छ भारत अभियान, स्किल इंडिया मिशन आणि प्रधानमंत्री जन-धन 
योजना सारख्या महत्त्वकांक्षी  योजना हाती घेतल्या आहेत. या योजनांमध्ये भारताला संपूर्ण बदलण्याची आणि सक्षम करण्याची आणि समाजाला सधन करण्याची क्षमता आहे. उद्ममशिलतेला  प्रोत्साहन देण्यासाठी भारताचे पंतप्रधान स्टार्ट-अप इंडिया, स्टॅन्ड अप इडिंया हे कार्यक्रम 16 जानेवारीला  सुरू करीत आहेत. या 
कार्यक्रमाची यशस्विता ही आपल्या शोधांच्या, युवकांच्या प्रतिभेवर आणि आपल्या नावीण्यपूर्ण संशोधन यांच्या सहभागावर अवलंबून आहे.  यावेळी राज्यपालांनी या परिषदेमध्ये विद्यापीठातील ज्या विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यांपकांनी आपल्या सृजनशील कल्पना मांडल्या आहेत, त्यांचे अभिनंदन करून सागिंतले की, मला खात्री आहे  यातीलच काही कल्पना आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरतील. पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे म्हणाले की, संशोधनाकडे छंद म्हणून नव्हे तर जबाबदारी म्हणून पाहिले पाहिजे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला आपला  दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. लोकसंख्येपैकी निदान एक टक्का तरी लोकांनी संशोधनाच्या कामात राहिल पाहिजे, दुर्देवाने आपण लोकांना 
नोकरीच्या शोधात पाठवित आहोत. आपण संशोधनाच्या गुणवत्ता आणि संख्या याकडे लक्ष दिले पाहिजे. 
अविष्कार सारख्या कार्यक्रमातून आपण संशोधनाला जे प्रोत्साहन देत आहोत, त्यामुळे मला आनंद वाटत आहे. विद्यापीठांच्या एकत्रित सहभागातून चांगले संशोधन होवू शकते, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून सांगितले की, 
विद्यार्थ्यांमधील  संशोधनाच्या प्रतिभेला संधी उपलब्ध करून देण्यासाठी अविष्कार संकल्पनेचा 10 वर्षापूर्वी 
जन्म झाला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना, प्रतिभा आणि  बुध्दीचा वापर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्यातील 20 विद्यापीठांनी या परिषदेत भाग घेतला असून त्यात विद्यार्थ्यांनी मानव्यशास्त्र, भाषा, फाईन आर्टस् , कॉमर्स, व्यवस्थापन, कायदे, प्युअर सायन्स, कृषी, 
पशूविज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषध आणि औषधी निर्माण आदि विषयावर 602 विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण विविध माध्यमातून केले आहे. 3 दिवस चालणार्‍या या स्पर्धात्मक कार्यक्रमातून यातील सर्वोत्तम संशोधन आणि संकल्पनांना निवडून पारितोषिके देवून त्यांचा गौरव केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी  आपल्या कल्पना योग्य नाहीत असे केव्हाही समजू नये.  वेगळ्या पध्दतीने विचार करायला विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे. उद्योग आणि संशोधकांनी एकत्र मिळून काम केल्यास आपण नक्कीच बदल घडवू शकतो असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. व्ही.बी. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर, डॉ. नरेंद्र कडू यांनी उपस्थितांचे आभार मानले.