Breaking News

ज्येष्ठांसाठी पोलीस ठाण्यात आता स्वतंत्र अधिकारी


पुणे (प्रतिनिधी) । 11 - सामाजिक सुरक्षा विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यात आला असून त्यांच्या समस्या  सोडविण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व दोन कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. शहर  पोलीस आणि अथश्री फाऊंडेशनतर्फे सुरक्षित ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत तब्बल 1 हजार 153 ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्यात आल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली.
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने (रेजिंग डे) 2 ते दि. 8 जानेवारी दरम्यान सामाजिक सुरक्षा  विभाग आणि अथश्री फाउंडेशनतर्फे डेक्कन, सांगवी, समर्थ, लष्कर, कोरेगाव पार्क, हडपसर, वानवडी, कोंढवा, सहकारनगर, भारती विद्यापीठ, बिबवेवाडी, शिवाजीनगर, कोथरूड, बंडगार्डन, खडक, फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे मेळावे आयोजित केले होते. त्या मेळाव्यात पोलिसांनी 1 हजार 153 ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र दिले असून त्यामध्ये त्यांची सर्व वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार्‍या स्वतंत्र कायद्याबाबत व त्यातील तरतुदींबाबत त्यांना माहिती देण्यात आली. शहरात एकूण 136 ज्येष्ठ नागरिक संघ असून त्यांची दरमहा पोलिस ठाण्याच्या स्तरावर बैठक घेतली जाते. पोलिसांकडे  असलेल्या माहितीनुसार, शहरात 642 ज्येष्ठ नागरिक हे एकटे राहतात तर 8 हजार 464 ज्येष्ठ हे कुटूंबासह रहावयास आहेत. ज्येष्ठांसाठी पोलिस ठाण्याच्या स्तरावर 2015 मध्ये 379 बैठका घेण्यात आल्या  आहेत. पोलिसांनी तब्बल 7 हजार 370 ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जावुन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या आहेत. पोलिस आयुक्त के.के. पाठक आणि सह आयुक्त सुनिल रामानंद यांच्या सुचनांनुसार सुरक्षित ज्येष्ठ नागरिक योजना कार्यान्वीत करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी सांगितले. आगामी काळात जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांची पोलिस दप्तरी नोंद करून त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या समस्या तसेच अडचणी (020) 26111103 या हेल्पलाईन क्रमांकावर कळवाव्यात असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलिसांना आत्तापर्यंत प्राप्त  झालेल्या तक्रारीमध्ये फसवणूक, गॅस एजन्सीची तक्रार, पेन्शन विषयक तक्रारी आणि फोन कंपन्याबाबच्या तक्रारींचा समावेश आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजकुमार  वाघचवरे, सहाय्यक निरीक्षक निता मिसाळ, उपनिरीक्षक दिपक सप्रे, गणेश जगताप, शशिकांत शिंदे, दत्ता जाधव, प्रमोद म्हेत्रे, नितीन तरटे, रमेश लोहकरे, राजेश उंबरे, संदीप होळकर, नितीन तेलंगे, नितीन लोंढे, महिला कर्मचारी जयश्री जाधव, दमयंती जगदाळे, अनुराधा ठोंबरे, ननिता येळे, आणि कविता नलावडे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे मेळावे घेतले.