Breaking News

जलसंधारणाच्या कामासाठी जि.प.ला निधी द्यावाः मंजूषा गुंड


 अहमदनगर । प्रतिनिधी । 24 -  जिल्हा प्रशासन जलयुक्त शिवार योजना राबविताना जिल्हा परिषदेला विश्‍वासात घेत नाही. जलयुक्त शिवार योजनेत समावेश होण्यासाठी आवश्यक असणार्‍या निकषात बसणारी अन्य गावेही आहेत. त्यांचा या योजनेत का समावेश होत नाही. जलयुक्त शिवार योजनेतून जिल्हा परिषदेला 
जलसंधारणाच्या कामासाठी निधी द्यावा, यासह शून्य ते शंभर हेक्टर क्षमतेच्या बंधार्यांना जिल्हा प्रशासनाने निधी द्यावा, असा ठराव जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 
शुक्रवारी मंजूषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार योजनेची बैठक झाली. बैठकीत कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेत समावेश झालेल्या 264 गावांची माहिती देण्यात आली. यावेळी योजनेच्या निकषावर चर्चा झाली. या निकषात बसणार्या अनेक गावांचा या योजनेत समावेश होवू शकतो, असे मत समितीत नोंदविण्यात आले. हा विषय सदस्य सुनील गडाख यांनी उपस्थित केला होता. तसेच शून्य ते शंभर हेक्टर क्षमतेच्या बंधार्यांना जिल्हा प्रशासनाने निधी द्यावा, असा ठरावही करण्यात आला. 
पिण्याचे पाणी टाकीच्या जमिनीचे सातबारा उतारे अद्ययावत करण्याची सूचना सभापती संदेश कार्ले यांनी केली. जलसंधारण आणि पाणी पुरवठा कामाच्या निविदा 10 टक्क्यांपेक्षा कमी दराने निविदा येत असल्याने या कामांच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. यासाठी अधिकारी व पदाधिकार्यांनी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. संगमनेर तालुक्यातील निमोण आणि 4 गावे, निमगाव भोजापूर प्रादेशिक पाणी योजना जीवन प्राधिकारण मार्फत शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही योजना पूर्ण झाल्यावर ग्राम पाणी पुरवठा समितीकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. बैठकीला उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, शरद नवले, मीरा चकोर, नंदा वारे, सदस्य अँड. सुभाष पाटील, हर्षदा काकडे, सुनील गडाख, शारदा भोरे, संदेश कार्ले आदी उपस्थित होते.