भूमाता ब्रिगेडच्या महिलांविरुध्द गुन्हे दाखल करावेत - शारदा घुले
अहमदनगर । प्रतिनिधी । 24 - जिल्ह्यातील शिंगणापूर येथे तिर्थक्षेत्र असलेल्या व भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शनि मंदिरातील चौथार्यावर हजारो वर्षाच्या रुढी परंपरेच्या विरोधात भुमाता ब्रिगेडच्या काही महिला धार्मिक स्थळाचे वातावरण गढूळ करण्याचा व धार्मिक भावना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रश्न धार्मिक भावनांशी निगडीत असल्याने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत. शिंगणापूर सह जिल्ह्याची शांतता भंग होउन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी. समाज विघातक अपप्रवृत्तीच्या विरोधात व कायदा हातात घेणार्या विरोधात जिल्हा प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करणारे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या शारदा घुले यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी स्विकारले. संपुर्ण देशाचे लक्ष लागलेल्या शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळावर महिला अध्यक्षांची निवड झाली.
हा देशातील क्रांतीकारी निर्णय असून शिंगणापूरच्या इतिहासात त्यामुळे नवीन पायंडा पडला आहे. श्री सक्षमीकरणाच्या दिशेने पडलेले हे महत्वाचे व सकारात्मक पाऊल आहे. असे असतांना भुमाता ब्रिगेडच्या महिलांनी 26 जानेवारीला चौथार्यावर जाऊन शनिदेवाची पुजा करण्याचा इशारा दिला आहे. संबंधितांना नोटिसा दिल्या तरी आंदोलन करणारच असे त्यानीं स्पष्ट केले आहे. असे असून त्यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा मागून जिल्ह्यातील प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा त्याचा डाव उघड होत आहे. अध्यक्षपदी महिलेची निवड झाली ती रुढी परंपरा जपण्यासाठी, मोडित काढण्यासाठी नव्हे. भुमाताच्या निर्णयाला जिल्ह्यातील एकही नागरिक पाठींबा देणार नाही. चौथार्यावर जाण्याची परवानगी जिल्ह्यातील महिलांना दिली तर त्या कधीच चौथार्यावर जाणार नाही. कारण, सर्वांना शनि महिमेची माहिती आहे. बाहेरुन एक दिवस यायचे व येथील रुढी परंपरा बदलावयाला लावायची ही कुठली पध्दत आहे.चौथार्यावर जाऊन दर्शन घेतले काय, आणि चौथार्याखालून दर्शन घेतले काय? शेवटी दर्शन घेणे महत्वाचे आहे रुढी परंपरा मोडित काढण्याचा बाहेरच्यांना काहीच अधिकार नाही.असे त्यांनी निवेदनात म्हटले होते.