Breaking News

खांद्याला खांदा लावून एक व्हा, मुस्लिमांची राजकीय ताकद दाखवून द्या - आ.अबू आझमी


सोलापूर, 11 - अयोध्येतील जागेचा खटला न्यायालयात सुरू आहे. 2016 संपण्यापूर्वी या ठिकाणी राम मंदिर 
बनविण्याची चर्चा सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार आहे. तुमच्यात हिंमत असेल तर 
2016 संपेपर्यंत तुम्ही अयोध्येत राममंदिर बनवून दाखवा, असे खुले आव्हान समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष 
आमदार अबू असीम आझमी यांनी आज येथे दिले. 
पक्षाच्या वतीने देश बचाओ, देश बनाओ‘ अभियानांतर्गत आज त्यांची जाहीर सभा झाली. या वेळी मुंबईचे 
नगरसेवक अशरफ आझमी, रिपाइं कवाडे गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे, मौलाना अजिजउल्ला, उत्तम  नवघरे, अप्पा काडादी, अबुतालिक डोंगरी आदी उपस्थित होते.  आमदार आझमी म्हणाले, जकात व खैरातमधून गरीब मुस्लिमांच्या घराचा व वस्त्राचा प्रश्‍न सुटेल, पण या देशात मुस्लिमांवर पोलिस व सरकारकडून होणार्‍या अन्यायाला रोखण्यासाठी सत्तेशिवाय पर्याय नाही. सत्तेची भीक मागण्यासाठी मुंबईहून सोलापूरला आलो आहे. खांद्याला खांदा लावून एक व्हा, मुस्लिमांची राजकीय ताकद दाखवून द्या. या देशातील हिंदू व मुस्लिम एकत्र आले तर आरएसएस‘ आपोआप नष्ट होईल. भाजपकडून मुस्लिम आरक्षणाची अपेक्षा करू नका. भारताला हिंदू राष्ट्र करण्याच्या हेतूने भाजपने अजेंडा राबविण्यास सुरवात
केली आहे.