Breaking News

चांगला माणूस होण्यासाठी व्यसनाला दूर ठेवा ः डॉ. अनिल अवचट

 पुणे (प्रतिनिधी)। 25 - शिशिर व्याख्यानमालेच्या आजच्या चौथ्या दिवशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी समाजातील व्यसनाधीनता या विषयावर बोलताना दारूमुळे मानवी शरीराची किती हानी होते याची माहिती सांगितली. दारुमुळेच मन, बुद्धी हात,पाय असणार्‍या मानवाची अवस्था एखाद्या जनावरसारखी होत असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात पोलीस अधिकारी संतोष पाटील आणि आधार संस्थेत काम करणार्‍या कुसुम गूरमाळे यांना सेवागौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी साम टीव्हीचे संपादक संजय आवटे, रोटरीचे अध्यक्ष संजीव दात्यें आणि अनघा रत्नपारखी उपस्थित होत्या.
पूर्वी कष्टकरी वर्गात दारू पिण्याचं प्रमाण फार होतं. पण आता ज्यावर संस्कृती रक्षणाची जबाबदारी आहे तो मध्यम वर्गच मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी गेला आहे. मुक्तांगण मध्ये येणार्‍या 150 लोकांपैकी 4 ते 5 जण डॉक्टर असल्याचे सांगत शिक्षित लोकही मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी गेले आहेत. यामध्ये पोलीस, संगणक क्षेत्रात काम करणारे असे सर्वच जण असल्याचे ते म्हणाले. पूर्वी वयाच्या तिसी नंतर दारू पिणार्‍यांंचे प्रमाण होते. आता तो आकडा खाली घसरून 15 ते 20 या वयोगटापर्यंत आला आहे. आणि तो चिंताजनक असल्याचे मत अवचट यांनी व्यक्त केले.
दारूचे व्यसन म्हणजे अवलंबित्वाचा प्रकार असल्याचे सांगत दारूसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असणार्‍यांची संख्या खूप जास्त आहे. समाजात दारूच्या व्यसनाला प्रतिष्ठा मिळत असल्याने तरुणाई तिकडे मोठ्या प्रमाणात ओढली जात आहे. आनंद घेण्यासाठी व्यसनाचा वापर न करता त्यासाठी इतरही अनेक गोष्टी असल्याचे ते म्हणाले. यासाठी झाडे लावा, चित्र काढा, कविता करा या छंदातूनही आनंद शोधता येत असल्याचे ते म्हणाले. संजय आवटे यांनी आपली सामाजिक रचना ही व्यसनाधीनतेकडे खेचणारी असल्याचे सांगत  आपल्या मुलांना  काय करायची नाही यापेक्षा काय करायचं  ते सांगितले म्हणजे व्यसनाधीनतेचा प्रश्‍न सुटू शकेल असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मधुरा शिवापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.