Breaking News

उद्योगमंत्री सुभाष देसाई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे प्रदर्शन

 नाशिक /प्रतिनिधी। 9 - उद्योग व्यवसायांसह विविध क्षेत्रात महिला मोठी प्रगती करत आहेत, उद्योगांमध्ये महिलांना अधिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात लवकर नव्या महिला उद्योग धोरणाची घोषणा करण्यात येईल असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.  
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरच्यावतीने (एम.ए.सी.सी.आय.ए.)  महिला उद्योजकांसाठी आयोजित प्रदर्शनाचे उदघाटन श्री देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा, एम.ए.सी.सी.आय.ए.चे अध्यक्ष  शंतनु भडकमकर, उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, आंतराष्ट्रीय धावपटू कविता राऊत आदी उपस्थित होते. 
उद्योग- व्यवसायात महिला अनेक महत्वाची पद भूषवत असल्याचे सांगून श्री. देसाई म्हणाले, लघुउद्योगांमध्ये मोठया  प्रमाणात महिला उतरत आहेत. सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करणार्‍या महिलांमध्ये जिद्द, चिकाटी  असे अनेक मूलभूत गुण आहेत. महिला उद्योजकांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी शासनाचे प्रयत्न जोरदारपणे सुरु आहेत. महिला उद्योजकांसाठी विशेष सवलती, औरंगाबाद येथे रबर क्लसटर, त्यांच्या संघटना, संस्थांना जागा, पुणे चाकण उद्योग क्षेत्रात  भूखंड देण्याचे निर्णय घेतले जात आहेत.
नाशिक येथील उद्योग विकासासाठी शासन करीत असलेले प्रयत्न सांगताना मंत्रीमहोदय म्हणाले, उद्योगांसाठी येथील महिला उद्योजकांची जागेची मागणी पूर्ण करु त्यांच्यासाठी उद्योग गाळे उपलब्ध करुन दिले जातील. 
तसेच नाशिक मध्ये  कायमस्वरुपी उद्योग प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी जमीन उपलब्ध करुन देण्यात आली असून निधी राखून ठेवण्यात आला आहे असे उद्योगमंत्री श्री देसाई म्हणाले.
याप्रसंगी महापौर श्री मुर्तडक,  एम.ए.सी.सी.आय.ए.चे अध्यक्ष  श्री.  भडकमकर, धवपटू कविता राऊत मनोगत व्यक्त केले.