भावी पिढीवर चांगले संस्कार घडावेत...
र्वप्रथम आज महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे आम्ही अभिनंदन करतो. साधारणत: हिंदु बहुजन समाजाला सत्ताधार्यांचे अभिनंदन करण्याची संधी क्वचितच मिळते. तशी विनोद तावडे यांच्या शिक्षकांसंदर्भात घेतलेल्या निर्णयातूनही त्यांच्या अभिनंदनाची संधी मिळाली. शिक्षकांनी मद्य आणि धुम्रपान करु नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारचा सूचना देवून त्यांनी हिंदु बहुजन समाजावार उपकारच केले आहेत. भारत हा खेड्यांचा देश आहे. तसा महाराष्ट्र हा देखिल खेड्यांचाच प्रदेश आहे. खेड्यांमधूनच जवळपास 95 टक्के समाज हा हिंदु बहुजनच असतो. त्यामुळे खेड्यांमधील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिकणारी मुले ही हिंदु बहुजनांची अधिकतर असतात. या शाळांमधील शिक्षक बर्याच प्रकरणांनी गाजत असतात. ग्रामीण भागातील शिक्षक राजकीय लोकांच्या मागेपुढे वावरत असतात. या शिक्षकांची मजलतर बदली किंवा एकाच शाळेमध्ये वर्षानुवर्षे रहाण्यासाठी एवढी असते की महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शिक्षकांना बदलीसाठी मंत्रालयात येण्यास खास बंदी घालावी लागली होती. त्यानंतर शिक्षकांचे अधिवेशन शिवाय वेगवेगळ्या जिल्ह्यातील पतपेढ्या आणि त्या अनुषंगाने त्यांच्या राजकारणाची काही केंद्रे यात देखिल ते सक्रिय असत. पण याबाबी विद्यार्थ्यांच्या दृष्टीन तितक्या गंभीर म्हणता येणार नाहीत. गंभीर बाब आहे ती म्हणजे जिल्हा परिषदांच्या शाळा सुरु असतांनाही मास्तरांनी दारुच्या गुत्यांकडे काहीवेळासाठी जावून येणे किंवा शाळा सुटल्यानंतर दिवसभर अशा दारुंच्या गुत्यांकडे त्यांचे दर्शन विद्यार्थ्यांना होणे या बाबी खूपच चिंताजनक म्हणाव्या लागतील. शिवाय ज्या सिगारेट आणि
तंबाखुच्या वेष्टनावर सिगारेट ओढणे किंवा तंबाखु खाणे आरोग्यास धोकादायक आहे अशा सुचना असतांनाही वर्गातील वर्गातील विद्यार्थ्यापुढे तंबाखु खाणे किंवा सिगारेट ओढणे याबाबी खरे तर अत्यंत गंभीर आहेत. परंतु अनेक खेड्यांमधून हि दृष्ये सातत्याने दिसत असतात. यावर शिक्षण मंत्री कसा आळा घालतात हे बघावे लागेल पण त्यांनी त्यासाठी जाहिर भूमिका घेतली ही खरच अभिनंदनाची बाब आहे. तसे पाहिले तर ग्रामीण भागातील शिक्षक देखिल प्रामुख्याने हिंदु बहुजन समाजातूनच आहेत. परंतु या समाजाची पहिल्याच पिढीचे नेतृत्त्व करणारे हे शिक्षक त्यांना मिळणार्या पगारामुळे किंवा आर्थिक उत्पन्नामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांना बळी पडतात. शिक्षकाला खासगी जीवन असते आणि असावे परंतु त्या खासगी जीवनाचा अर्थ एवढाच की त्या शिक्षकाला काही व्यसन असेल तर त्याने त्याच्या घराच्या चार भिंतीत राहूनच ते करायला हवे. याचे भान न ठेवता तो जर गावात बिनबोभाटपणे दारुच्या गुत्यांवर दिसू लागला किंवा विद्यार्थ्यांच्या समोर धुम्रपान करु लागला तर यातुन हिंदु बहुजन समाजाची जी पहिली दुसरी पिढी शिक्षण घेत आहे तिच्या समोर कोणता आदर्श ठेवला जाईल याची त्यांनी काळजी करायला हवी. आज ग्रामीण भागातील विद्यार्थी धाडसी असला तरी अनुकरणशील असतो. त्यामुळे इतरांकडे पाहून किंवा त्याच्या शिक्षकांकडे पाहून जर तो त्याच पध्दतीचे आचरण करु लागला तर भविष्यातील पिढी ही निश्चितपणे वेगळ्या प्रकाराची राहील. समाजवास्तव कोणतेही असो परंतु चोरी, मद्यपान, हिंसक विचार, धुम्रपान यापासुन अलिप्त असायला हवे. ही मुल्ये कोवळ्या वयातच मुलांच्या मनावर कोरली जायला हवीत, कारण प्राथमिक शाळेत जाणारा विद्यार्थी आणि त्याचे वय पहाता याच काळात त्याच्यावर संस्कार होत असतात. कोणताही संस्कार हा शाळेत शिकविल्या प्रमाणे शिकविता येत नाही. तर तो संस्कार आजुबाजुच्या समाजाकडे पाहून त्यांच्या आचरणातून आणि व्यवहारातुन प्रत्येक मुलगा किंवा मुलगी शिकत असते. त्यामुळे समाज वास्तव, समाजाचा व्यवहार हा असाच असावा
की जेणेकरुन भावी पिढीवर चांगले संस्कार घडावेत.