Breaking News

वाद पर्यटन अ‍ॅम्बेसेडरचा...

देशात असहिष्णूता वाढल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी अभिनेता अमिर खान याने एका प्रसार माध्यमाच्या जाहीर कार्यक्रमातून केला होता. त्यामुळे यापुढील काळात शासनाशी त्याचे असणारे संबंध जे मुख्यत: कलेवर आधारलेले आहे, ते संपुष्टात येतील अशी खात्री मनोमनी झाली होती. त्याची परीणती काल अतुल्य भारत या पर्यटनाच्या जाहिरातीतून अमिर खानची गच्छंती करण्यात झाला. याचे स्पष्टीकरण देतांना केंद्रिय पर्यटन विभागाने खाजगी एजंटशी अमिर खानचा आर्थिक करार संपुष्टात आल्याचे सांगितले होते. मात्र अमिरने लगोलग त्याचे खंडण करत गेली दहा वर्षे आपण अतुल्य भारतच्या कोणत्याही जाहिरातीसाठी कोणतेही मानधन घेतलेले नाही असे जाहिर केले. आपण या जाहिरातीच्या माध्यमातून देशाची सेवा केल्याचा आपणास अभिमान आहे अशा शब्दात प्रतिक्रिया देत असतांनाच त्याने सरकारला आपल्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असेही जाहीर केले. याचा अर्थ गेल्या दहा वर्षांत भारताची आंतरराष्ट्रिय प्रतिमा पर्यटनाच्या क्षेत्रात उंचावण्याचे काम करुनही तेही विना मानधन तरीही अमिरची गच्छंती ही अशा प्रकारच्या असहिष्णूतेचीच निदर्शक म्हणावी लागेल. याउलट अमिताभ बच्चन यांची अतुल्य भारत जाहिरातीसाठी निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अमिताभ बच्चन यांचा खासदारकी नंतरचा जर कालावधी पाहिला तर तो देश सेवेपेक्षाही आर्थिक मानधनावर आधारलेला आहे.  गुजरातचे पर्यटन अ‍ॅम्बॅसेडर म्हणून आणि त्यापूर्वी उत्तर प्रदेशाचे पर्यटन अ‍ॅम्बॅसेडर म्हणून अमिताभने केवळ आर्थिक हिशोबच पाहिले आहेत. आतातर अमिताभची वर्णी केंद्र सरकारच्या जाहिरातीत लागणे याचा अर्थ पर्यटनासाठी केल्या जाणार्‍या जाहिरातीतला कोट्यवधी रुपये त्यांच्या तिजोरीत जमा होणार. दोन कलाकारांपैकी एकाने विनामुल्य दहा वर्षे सेवा दिली आणि दुसर्‍या कलाकाराने मानधनासह सेवाशर्थी टाकून सेवा देणे यात देशाला कोणती सेवा घेतली पाहिजे याचा सारासार विचार शासन व्यवस्थेनेच केला पाहिजे. कोणताही कलाकार आपल्या जीवनातील अतुल्य कलेचे प्रदर्शन केल्याशिवाय लोकप्रियतेच्या शिखरावर जात नाही. अमिताभ बच्चन यांच्या संदर्भात यापूर्वी बरेच आरोप झाले आहेत. विशेषत: शेतकरी असल्याचा खोटा दाखला त्याचप्रमाणे ग्रामीण आणि दुर्गमभागातील शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेणार्‍या सुझलान सारख्या पवनचक्की ठिकठिकाणी निर्माण करणार्‍या कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचेही यापूर्वी उघड झाले आहे. त्यामुळे केलेपेक्षाही ज्यांच्या एकूणच कला जीवनात वेगवेगळे वाद निर्माण झाले आहेत त्यांना देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रिय स्तरावर निर्माण करण्यासाठी करारबद्ध करणे हे देखिल वादग्रस्त ठरु शकते. देशाची प्रतिमा निर्माण करतांना 
देशातील जनतेचा मतप्रवाह देखिल लक्षात घ्यायला हवा. कारण अशा प्रकारच्या जाहिरातींवर देशातील जनतेचा पैसा खर्च होतो. त्यामुळे कलाकारांची निवड होतांना निस्पृहता आणि निस्वार्थपणा या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एकंदरीत भारताची आंतरराष्ट्रिय प्रतिमा पर्यटनाच्या क्षेत्रात निर्माण करण्यासाठी अगदी कलेच्या क्षेत्रातील शिखरावर असलेल्या व्यक्तींनाच घ्यावे असे काही लिखित बंधन नाही. त्याऐवजी देशातील सामान्य जनतेतील वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळी माणसे निवडून त्यांना अशा प्रकारचा अनुभव द्यायला हवा. भारतीय शेतीत पर्यटन करतांना शेतीची प्रतिमा ज्या आत्मियतेने शेतकरी सादर करु शकतो त्याच आत्मियतेने जंगलात रहाणारा आदिवासी जंगल सफारी किंवा जंगलाच्या पर्यटनाविषयी आत्मियता दाखवू 
शकतो. येथिल शिक्षण, ऐतिहासिक स्थळे, बगीचे, किल्ले, पर्वत या सर्वच संदर्भात त्या-त्या क्षेत्रातील सामान्य माणसे
निवडून त्यांना पर्यटनाचा अ‍ॅम्बॅसेडर करायला हवे.