Breaking News

साहित्य संमेलनाची माहिती देणारे मराठी साहित्य गौरव ई-बुकचे प्रकाशन


 पिंपरी (प्रतिनिधी) । 11 - पिंपरी-चिंचवडमध्ये होणार्‍या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची 
विस्तृत माहिती देणारे मराठी साहित्य गौरव हे ई-बुक रविवारी (दि. 10) प्रकाशित झाले. एखाद्या साहित्य 
संमेलनाची माहिती ई-बुकच्या माध्यमातून देणारे हे देशातले पहिलेच ई-बुक आहे. त्यातून जगभरातील मराठी भाषा आणि साहित्यप्रेमी तरुण रसिकांपर्यंत हे संमेलन थेट पोचणार आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि ई-बुकची निर्मिती करणार्‍या डेलीहंट या संस्थेतर्फे पुण्यातील पत्रकार 
भवनात आयोजित कार्यक्रमात सीड इन्फोटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र बर्‍हाटे यांच्या हस्ते या 
ई-बुकचे प्रकाशन झाले. यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 
अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, महामंडळाचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, ज्येष्ठ कवी अरूण शेवते, डेलिहंटच्या संचालक 
अंजली देशमुख, तंत्रज्ञ प्रतिक पुरी, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, पत्रकार प्रतिष्ठानचे 
अध्यक्ष उमेश घोंगडे आणि संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर उपस्थित होते.
नरेंद्र बर्‍हाटे म्हणाले, आपली भाषा आणि संस्कृती यांच्यावर चार प्रकारची आक्रमणे होत असून त्यात इंग्रजी 
भाषेचे मराठी विचारांवर होणारे प्रदूषण, सोशल मीडिया, मोबाईलमुळे जगाशी जोडली जाण्याची ताकद,  
माहितीचे विश्‍लेषण तंत्र आणि क्लाउडच्या माध्यमातून तिची साठवण करण्याची ताकद यांचा समावेश होतो. 
त्यापैकी पहिल्या दोन आक्रमणांना ‘मराठी साहित्य गौरव’या मराठी ई-बुकने चोख उत्तर दिले आहे. यातून 
जगभरातील मराठी माणूस साहित्य संमेलनाशी जोडला जायला मदत होईल, असा त्यांनी व्यक्त केला. 
उल्हास पवार म्हणाले, भाषा आणि संस्कृती या एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे शिक्षण व साहित्यात मातृभाषेचे महत्व महात्मा गांधींपासून अनेकांनी गौरवले आहे. वैचारिक व सांस्कृतिक प्रदूषण रोखण्यासाठी साहित्य मोलाची भूमिका बजावते. हे मराठी संमेलनावरील ई-बुक जगभरात जाणार आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. 
या ई-बुकमध्ये 89 व्या साहित्य संमेलनाची संपूर्ण निमंत्रण पत्रिका, आयोजक संस्था डॉ. डी. वाय. पाटील 
विद्यापीठाची माहिती, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा इतिहास, आतापर्यंतच्या 88 साहित्य 
संमेलनांचा इतिहास, आजी आणि माजी संमेलनाध्यक्षांची ओळख अशी विविध माहिती 200 हून अधिक 
पृष्ठसंख्येत समाविष्ट करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र मुंजाळ यांनी केले.