स्वाभिमानीतर्फे वसंतदादा कारखान्यामोर धरणे
सांगली ः दि. 9 - वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने शेतकर्यांची थकित बिले द्यावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याच्या गेटसमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली. दुपारी अध्यक्ष विशाल पाटील यांच्या घरासमोर भाकरी माग आंदोलनही करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखाना गेटसमोर थकित बिलांच्या मागणीच्या घोषणा देत धरणे आंदोलनास सुरुवात केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, 28 डिसेंबर रोजी संघटनेने थकित बिलांच्या प्रश्नावर कारखाना प्रशासनास तसेच अध्यक्षांना निवेदन दिले होते. या निवेदनाची कोणतीही दखल कारखान्याने घेतली नाही. शेतकर्यांची 2013-14 पासूनची ऊस बिले थकित आहेत. त्यावर्षीचे 13 कोटी, 14-15 च्या हंगामातील 5 कोटी थकित आहेत. 2015-16 च्या हंगामातील केवळ पंधरा दिवसांचीच बिले शेतकर्यांना मिळाली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर थकबाकी असताना, कारखाना चालक शेतकर्यांच्या बिलाबाबत मौन बाळगून आहेत. इतक्या वर्षांची बिले थकित कशासाठी ठेवली आहेत? शासन आदेशानुसार एफआरपीसाठी जिल्हा बँकेकडून वसंतदादा कारखान्याला अर्थपुरवठाही झाला आहे. हे पैसे गेले कुठे?, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. वसंतदादा कारखान्याने शेतकर्यांची थकित व चालू बिले ताबडतोब द्यावीत, जोपर्यंत ही बिले मिळणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी कारखाना चालकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, प्रवक्ते महेश खराडे, संभाजी मेंढे, संजय बेले, बी. आर. पाटील आदी सहभागी झाले होते.