Breaking News

क्रिकेटवर सट्टा लावणार्‍या दोघांना अटक

। भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया मॅच । 12 लाखांसह साहित्य जप्त । पुण्याचा आरोपी फरार । गुन्हे शाखेची कारवाई
 अहमदनगर । प्रतिनिधी । 22 -बुधवारी झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यांवर नगरमध्ये सट्टाबाजार (बेटींग) सुरु असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून नगरच्या दोघांना अटक करुन दोघांकडून 12 लाख 10 हजार 120 रुपये आणि 11 मोबाईल, एक दुरदर्शन संच, 1 लॅपटॉप असे साहित्य जप्त केले. रोख रक्कमेसह साहित्य जप्त करण्याची ही नगरमधील पहिलीच घटना आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपींना जामीन मंजूर झाला. 
अटक आरोपीमध्ये मोहन मथुरादत्ता जोशी (वय 40, कस्तुरी निवास,गुलमोहोर रोड), अशोक भाऊसाहेब गर्जे (वय 31, कॅनेटिक चौक,नगर) यांचा समावेश आहे तर देडाशेठ उर्फ रमेश मिलानी (पिंपरी चिंचवड,पुणे) हा फरार आहे. पोलिस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी यांना मिळालेल्या माहितीवरुन हा छापा टाकण्यात आला. 
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे, उपनिरीक्षक संदिप शिंदे, हे.कॉ.योगेश गोसावी, सुनिल गायकवाड, दत्तात्रय हिंगडे, संदिप पवार, जितेंद्र गायकवाड, रावसाहेब हुसळे, उमेश खेडकर, सुरेश वाबळे, रोहित रसाळ, मनिषा पुरी, प्रियंका चेमटे, दिपाली घोडके यांच्या पथकाने कारवाई केली. 
ऑस्ट्रेलियातील मलिकेमधील 20-20 चे ही सामने खेळले जाणार आहेत. त्यामुळे या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरमध्ये सट्टेबहाद्दरांनी डोके वर काढू नये, यासाठी पोलिसांकडून अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले. मात्र, तोफखाना पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले मात्र, आरोपींकडे रोख रक्कम व साहित्य सापडले नाही. त्यामुळे बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये रोख रक्कम व साहित्य जप्त करण्याचे ठरवून पोलिसांनी पुर्ण माहिती घेऊन नियोजनबध्द सापळा लावला. पुर्ण खात्री झाल्यानंतर छापा टाकण्यात आला. असे पोलिसांकडून सांगण्यात आले. आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेल्या मोबाईलवरुन सट्टा खेळणार्‍यांची नावे शोधण्याचे काम सुरु आहे. गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती मोठी असल्याने सदर गुन्हा तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे ठेवण्यात आला आहे. फरारी आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथक पुण्याकडे पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यापुर्वी आयपीएल स्पर्धेवर नगरमध्ये मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजार सुरु होता. मात्र, काही पोलिसांचीच सट्टेबाजार करणार्‍यांकडे चांगली ओळख असल्याने आत्तापर्यंत पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी माहिती असूनही छापे टाकले नाहीत. मात्र, या कारवाईमुळे सट्टेबाजारांमध्ये खळबळ उडाली आहे.