लाखोंचा गुटखा पुर्णा पोलिसांच्या ताब्यात
पुर्णा, दि.09 - वसमतकडुन परभणीकडे अवैधरित्या गुटख्याचा साठा घेवुन जाणारी इंडीका कार पुर्णा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या मध्ये लाखोचा गुटखा सापडल्याचे पोलिस सुत्राकडुन सांगण्यात आले. दरम्यान पुर्णा तालुक्यासहित शहरात खुलेआम गुटखाविक्री व इतर अवैध धंदे सुरू असुन याकडे पुर्णा पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.
याबाबत अधिक असे की, पुर्णा येथील उपविभागीय अधिकारी ए.जी. खान, पोनि माचरे यांच्या पथकाने रात्री 9.30 च्या सुमारास वसमत येथुन परभणीकडे अवैध गुटख्याचा साठा घेवुन जाणारी इंडीका कार पकडुन ताब्यात घेतले असता या इंडिकामध्ये गोवा, माणिकचंद व इतर गुटख्याचा साठा व इंडीका कार मिळुन जवळजवळ अंदाजे तिन लाखाचा माल जप्त करुन सदर घटनेची माहिती परभणीच्या अन्नभेसळ च्या अधिकार्यांना कळविले. तेंव्हा परभणी येथुन अन्नसुरक्षा अधिकारी सुनिल जिंतुरकर यांनी पुर्णा पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिल्याने परभणी येथील गुटखा विक्रेते शे. समीर शे. जमीर, शे. समिर पिरसाब शे.फेरोज शे. अजीज या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच रात्री पोउप वि.अधिकारी खान व पोनि माचरे यांनी झिरोफाटावरुन येत असतांना दोन अवैध वाळुचे ट्रक व एक ट्रॅक्टर सुध्दा ताब्यात
घेतले आहे. दरम्यान तालुक्यात व शहरात खुले आम गुटखा व इतर धंदे सुरू असुन स्थानिक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे पुर्णा तालुका हा अवैध गुटख्याचे माहेर घर असुन शहरात आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी ठिकाणांहुन लाखोंचा गुटखा येत आहे व पुर्णेतुनच इतर जिल्ह्यात सर्व गुटखा पुरवला जात असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे परभणीचे अन्नभेसळ अधिकारी व स्थानिक पोलिस अधिकारी या गुटखा विक्रीकडे जर दुर्लक्ष करत असल्याची उलट-सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे.