Breaking News

यंत्रणांचा विरोधाभास...


काही वर्षांपूर्वी मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला आणि गुरूदासपूरवर झालेला दहशतवादी हल्ला यात साम्य असल्याची चर्चा सुरू होण्यापूर्वीच त्याला इतर बातम्यांमुळे फारसा प्रतिसाद मिळाला नाही; परंतु आज जम्मू काश्मिरमधील पठाणकोट येथील हल्ला देखील अशाच प्रकारचा आहे. मात्र, हा हल्ला थेट हवाईतळ असणार्‍या अड्ड्यावर झाल्यामुळे अधिक गंभीर आहे. देशांतर्गत देशातील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारे संरक्षण असणार्‍या स्थळांवर नियमाशिवाय प्रवेश करणे कठीणच नव्हे तर अशक्य होते, मात्र विदेशातून आलेल्या दहशतवाद्यांना देशाच्या अत्यंत महत्वपूर्ण ठिकाणी प्रवेश कसा मिळतो हा प्रश्‍न देशांतर्गत संरक्षण व्यवस्थेची दशा आणि दिशा स्पष्ट करणारा ठरतो. हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांनी कसा प्रवेश मिळविला याच्या रंजक कथा सांगण्यास माध्यमांनी सुरूवात केली आहे. नेहमीप्रमाणेच परिणामांवर चर्चा करण्याचा परिपाठ माध्यमांनी सुरु केला आहे. काही माध्यमे तर दहशतवाद्यांनी सैनिकी पोषाखात प्रवेश केल्यामुळे त्यांचा सहज शिरकाव होऊ शकला असे म्हणण्याची मजल गाठत आहेत. एखाद्या सार्वभौम देशाच्या संरक्षण व्यवस्थेला छेदून प्रवेश करणे इतके सहज असू शकते का हा खरा प्रश्‍न आहे. त्यामुळे देशात काही काळाच्या अंतराने एकापेक्षा अधिक दहशतवादी हल्ले होत असतील तर आता देशांतर्गत असणार्‍या यंत्रणांमध्ये कोणी गद्दार शिरला आहे का त्याकडे आता लक्ष द्यायला हवे. देशाच्या प्रत्येक नागरिकाला जीवित आणि वित्त रक्षणाचा अधिकार असताना दहशतवादी इतक्या सहजपणे तो अधिकार संपुष्टात आणत आहेत याचाच अर्थ देशातील यंत्रणांकडे आता संशयाने पाहायला हवे. कारण विदेशातील दहशतवादी देशाची आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबई महानगरात जितक्या सहजतेने प्रवेश करतात तितक्याच सहजतेने त्यांनी शूरवीरांची भूमी समजली जाणार्‍या पंजाबच्या गुरूदासपूरमध्येही प्रवेश केला होता. आता तर संवैधानिक दर्जा प्राप्त असलेल्या आणि संरक्षणाच्या अत्यंत संवेदनशिल असलेल्या जम्मू काश्मिर मधील पठाणकोट येथील सैन्याच्या तळावरच त्यांनी हल्ला केला आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे विदेशी शक्ती आहेत हे उघड सत्य आहे; परंतु यामागील गुपित सत्यही उघड व्हायला हवे. विदेशातील दहशतवादी दोनच कारणास्तव आमच्या देशात प्रवेश करू शकतात. एक तर आमच्या यंत्रणा गाफिल असतील तर आणि दुसरे आमच्या यंत्रणांत कुणी षडयंत्र रचत असेल तर. विदेशातील दहशतवाद्यांंना या भूमीत प्रवेश केल्यामुळे कठोरातील कठोर शिक्षा व्हायलाच हवी. पण त्याचबरोबर ज्या यंत्रणांच्या गाफिलपणामुळे हे सगळे घडून येत आहे त्यावरही आता कठोर उपाययोजना व्हायला हवी. गेल्या दीड वर्षांपासून केंद्रात गठीत झालेले सरकार पाकिस्तान बरोबर संबंध सुधरविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे; परंतु त्याच बरोबर काही वादग्रस्त घडामोडी देखील नव्या सरकारच्या काळात घडून येताना दिसतात. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुुकतीच आणि अचानक पाकिस्तानला भेट दिलेला घटनाप्रसंगही येतो. हे सरकार नव्याने सत्तेवर आले तेव्हा मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड समजला जाणारा हाफिज सईद याला भेट देण्यासाठी भारतातून एक तथाकथित विचारवंत गेला होता. अशा संशयास्पद घटना या टाळायलाच हव्यात. दहशतवादी विचारांना प्रेमाच्या भाषेने जिंकता येत असले तरी प्रेमाची भाषा करणार्‍यांची पारदर्शिता यात अधिक महत्वाची असते. त्यामुळे पाकिस्तान बरोबर कोणतेही संबंध विस्तारण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी पारदर्शी व्यवहारांचा अवलंब करायला हवा. नाही तर एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय प्रसिध्दी असणारा गायक फतेह अली याला हैद्राबाद विमानतळावरुन परत पाठविले जाते आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी सैन्य तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ला होतो या घटना आमच्याही यंत्रणांचा विरोधाभास उभा करतात.