Breaking News

पंजाबमध्ये हल्ला; चार दहशवादी ठार - सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद, पाच जखमी


पंजाबमधील पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर हल्ला करणार्‍या चारही पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हवाई दलाच्या इमारतीत आणखी तीन दहशतवादी लपले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुरक्षा दलाच्या शोधमोहिमेदरम्यान हवाई दलाच्या इमारतीजवळून स्फोटाचे दोन मोठे आवाज आले असून चकमक सुरू असल्याचे वृत्त आहे. जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले असून अन्य पाच जवान जखमी झाले आहेत.
लष्कराच्या वेषात आलेल्या काही दहशतवाद्यांनी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास हवाई दलाच्या तळावर अंदाधुंद गोळीबार करत जोरदार हल्ला चढवला. हवाई दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. त्यामुळे या परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता निर्माण झाली त्या परिसरात हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय, सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांच्या नेमक्या ठिकाणाचा शोध लावण्यासाठी या परिसरात ड्रोन्स विमानेही तैनात करण्यात आली आहेत. भारतीय हवाईदलाचा पठाणकोटचा तळ पाकिस्तानी सीमेपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी हवाई दलाची मिग-21 विमाने आणि एमआय-25 ही लढाऊ हेलिकॉप्टर्स ठेवण्यात येतात. या हल्ल्यानंतर जम्मू-पठाणकोट महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे. सध्या सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पंजाब पोलिसांच्या जवानांनी हवाई तळाच्या संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या (एनएसए) ब्लॅक कॅट कमांडोचे पथक दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत आहेत. लष्कराच्या विशेष पथकाचे जवानदेखील या कारवाईत सहभागी आहेत. लष्कराची चार हेलिकॉप्टर्सदेखील या कारवाईत सहभागी झाली आहेत.