Breaking News

भारत आणि पाकिस्तानदरम्यानची चर्चा रद्द झाल्याचे वृत्त चुकीचे : अजित दोवल


नवी दिल्ली, 11 - भारत आणि पाकिस्तानदरम्यानची परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा रद्द झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोवल यांनी स्पष्ट केले.
एका वृत्तपत्राने भारत आणि पाकिस्तान दरम्यानची परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा रद्द झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तपत्राने दोवल यांनी दिलेल्या मुलाखतीत चर्चा रद्द झाल्याचे म्हटल्याचा दावा केला आहे. यावर स्पष्टीकरण देताना दोवल यांनी आपण कोणतीही मुलाखत दिली नसल्याचे आणि चर्चा रद्द झाल्याबाबत कसलेही वक्तव्य केले नसल्याचे म्हटले आहे.
दोवल यांच्या स्पष्टीकरणामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये ठरल्याप्रमाणे 15 जानेवारीला चर्चा होईल, असा विश्‍वास आहे. भारतीय हवाई दलाच्या पठाणकोट तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशांतील या चर्चेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. दोन्ही देशांनी ठरविलेल्या ‘सर्वसमावेशक संबंध चर्चे’च्या विषयानुसार होणार्‍या या चर्चेची वेळ दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव निश्‍चित करतील. दोन्ही देशांत होणार्‍या या चर्चेत अन्य विषयांबरोबरच काश्मीरचा मुद्दाही असेल, असे पाकचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी सांगितले.