Breaking News

नदीला बॅकयार्डपासून फ्रन्टयार्ड पर्यंत आणण्यासाठी प्रयत्न गरजेचे - आयुक्त

पिंपरी (प्रतिनिधी), 31 -  पवना नदीच्या प्रदूषणामुळे नदी बॅकयार्डप्रमाणे झाली आहेत त्यामुळे पवना नदीला बॅकयार्डपासून फ्रन्टयार्ड पर्यंत कसे आणायचे यासाठी महापालिकेबरोबरच सगळ्यांचे प्रयत्न महत्वाचे आहेत, असे मत आयु्क्त राजीव जाधव यांनी व्यक्त केले. पवना नदीच्या जलशुद्धीकरणाविषयी चर्चा करण्यासाठी आज (शनिवार) ताथवडे येथील जेएसपीएम इन्स्टिट्यूट येथे सीएसआरची (उेीिेीरींश ीेलळरश्र ीशीिेपीळलळश्रळीूं) सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 
यावेळी जलशुद्धीकरण यावर चित्रफितीद्वारे सादरीकरण करण्यात आले. यामधून पिंपरी- चिंचवड मधील पवनामाईचे स्वरुप समजवून सांगण्यात आले. महापालिका आयुक्त राजीव जाधव, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलशुद्धीकरण विभागातील कार्यकारी अभियंता प्रविण लडकत, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, जलदिंडी प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. विश्‍वास येवले, जलदिंडी सदस्य राजीव भावसार, जेएसपीएम इन्स्टिट्यूटचे प्राचार्य प्रशांत हंबर, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सचिव  सूर्यकांत मुथियान, उद्योजक मनोजकुमार फुटाणे, पिंपरी-चिंचवड सिटिझन फोरमचे सदस्य धनंजय शेडबाळे, एनबीए समन्वयक आणि शैक्षणिक संचालक  डॉ. अविनाश खरात, ग्राम प्रबोधिनीचे प्राचार्य व्यंकटेश भदाणे, विलो मॅथर प्लॅट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वाटवे, आशिष पाटील, सागर दानी, वैभव घुगे, सीएसआर सभासद आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थाचे सभासद आदी उपस्थित होते.
आयुक्त पुढे म्हणाले की, आत्ताची नदीची जी परिस्थिती झाली आहे त्यामुळे नदी पूर्वीसारखी स्वच्छ, निर्मळ राहिलेली नाही. लोकांना नदीवर जाण्याची इच्छा झाली पाहिजे. त्यासाठी नदीच्या स्वच्छतेसाठी जनजागृतीची गरज आहे. कोणत्याही प्रकारचा कचरा, घाण नदीमध्ये टाकता कामा नये हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. तेव्हाच सगळ्याच नद्यांची परिस्थिती सुधारु शकेल.
यावेळी डॉ. विश्‍वास येवले यांनी नद्यांच्या आत्तापर्यंत करण्यात आलेल्या स्वच्छतेची माहिती सांगितली, तसेच तलावाची साफसफाई करणे एकवेळ शक्य आहे, पण नदी पुनर्जीवित करणे कठीण आहे, यामध्ये सगळ्यांचाच सहभाग महत्वाचा आहे, असेही ते म्हणाले. नदीला आपण मातेसमान मानतो आणि त्याच नदीत सांडपाणी, घाण सोडले जाते, हे सगळे थांबण्याची गरज आहे. नदीला मातेसमान मानण्यासाठी तेवढीच ती स्वच्छ ठेवणे हेही आपले कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले. 
प्रविण लडकत म्हणाले की, ग्रामीण भागात नदीचे पाणी स्वच्छ तर त्याच नदीचे शहरी भागात विदारक दृश्य बघायला मिळते आहे. नदीचे घाट आणि नदीचे काठ यावर काम करण्याची गरज आहे. या स्वच्छतेमध्ये वैयक्तिकरित्या, संघटनेने, संस्था, शाळा कोणीही सहभागी होऊ शकते, तसेच जनजागृती, वृक्षारोपण, नालेसफाई, घाटावरील स्वच्छता या सगळ्या गोष्टी मनावर घेऊन योग्यरितीने केल्या गेल्या तर नक्कीच नदीचे स्वरुप बदललेले असेल असे मार्गदर्शन केले.   
धनंजय शेडबाळे म्हणाले की, स्वच्छता मोहिमांमध्ये सामाजिक संस्था सहभाग असणे महत्वाचे आहे. त्याप्रमाणे ‘पावन पवना’ असे या मिशनचे नाव असले पाहिजे. घरातील सांडपाणी नदीमध्ये सोडले जाते, ते टाळण्यासाठी सांडपाण्याचेही व्यवस्थापन करण्याची गरज आहे. याप्रमाणे किचन वेस्ट सारख्या इतरही कचर्‍याच्या आणि नदीप्रदूषणाच्या समस्यांवर व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. 
तसेच हेमंत वाटवे म्हणाले की, पाण्याने आपल्याला जे जीवन दिले आहे त्याचे उत्तरदायित्व म्हणून आपणही नदीसाठी काही केले पाहिजे. त्यातूनच प्रत्येक कंपनीने जलशुद्धीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन याबोबत योग्य दिशा ठरवणे महत्वाचे आहे. 
व्यंकटेश भदाणे म्हणाले की, नदी स्वच्छ असणे आणि नागरिकांचे आरोग्य चांगले असणे या दोन्हा गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत, आणि नद्या स्वच्छ झाल्या तर मिळणारे पाणी स्वच्छ असेल त्यामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहील. यासाठी जास्तित जास्त लोकांनी या उपक्रमांमध्ये सहभाग घेणे महत्वाचे आहे.