शरद पवारांच्या हस्ते होणार नागवेडेंचे अभिष्टचिंतन !
श्रीगोंदा । प्रतिनिधी । 18 - राज्य साखर संघाचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या 82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे शुभहस्ते अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. येत्या शनिवारी(दि.23) संपन्न होणा-या या कार्यक्रमात शरद पवार यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त तालुक्यातील जनतेच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी शेतकरी मेळावा आयोजित केला असल्याची माहिती ’नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.
यासंदर्भात माहिती देताना नागवडे म्हणाले की, तालुक्याच्या सहकार,कृषी,शिक्षण,सिंचन,साहित्य,सांस्कृतिक, कला व क्रिडा अशा सर्वांगिण विकासासाठी गेली सहा दशके अतुलनीय योगदान देणा-या शिवाजीराव नागवडे बापूंचा 82 वा वाढदिवस येत्या मंगळवारी (दि.19) आहे.तर शेतक-यांचे नेते शरद पवार यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस 12 डिसेंबर रोजी झाला आहे.म्हणून तालुक्यातील जनतेच्यावतीने या दोन्ही ऋषितुल्य व्यक्तिमत्वांचा कृतज्ञता सोहळा येत्या शनिवारी(दि.23) कारखाना कार्यस्थळावरील इंदिरा गांधी विद्यालयाचा प्रांगणात दुपारी तीन वाजता संपन्न होणार आहे.82 व्या वाढदिवसानिमित्त नागवडे यांचे पवार यांचे हस्ते अभिष्टचिंतन व सत्कार केला जाणार आहे तर अमृतमहोत्सवी वाढदिवसाबद्दल पवार यांचा तालुक्यातील जनतेच्या वतीने कृतज्ञता सोहळा व सत्कार केला जाणार आहे.
माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणा-या सोहळ्याला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,माजीमंत्री मधुकरराव पिचड,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,माजीमंत्री व सहकारातील जेष्ठ नेते शंकरराव कोल्हे,माजी खासदार यशवंतराव गडाख,दादा पाटील शेळके,आमदार डॉ.सुधीर तांबे,आ.अरुणकाका जगताप,आ.राहूल जगताप,’घोडगंगा’ कारखान्याचे अध्यक्ष अॅड.अशोकराव पवार, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, आ.वैभव पिचड, आ. भाऊसाहेब कांबळे,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत ससाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, आ.संग्राम जगताप,माजी आ.आप्पासाहेब राजळे,भानुदास मुरकुटे, कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप, जि.प. अध्यक्षा मंजूषा गुंड,उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, राज्य मजूर महासंघाचे उपाध्यक्ष अर्जूनराव बोरुडे,अरुण पाटील कडू,जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर,माजी आ. अशोक काळे,महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस,माजी आ.दादाभाऊ कळमकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती देवून नागवडे म्हणाले की, नागवडे व पवार या ऋषितुल्य व्यक्तिमत्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार असून यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्य कार्यक्रमापूर्वी सहकारी संघाचे वतीने सभासद,शेतक-यांना सहकार प्रशिक्षण दिले जाणार आहे.या प्रशिक्षणात 97 व्या घटनादुरुस्तीनंतर सहकार कायद्यात झालेल्या बदलांची माहिती दिली जाणार आहे.
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे व शेतकर्यांचे नेते शरद पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला व शेतकरी मेळाव्याला सभासद, शेतकरी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ’नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे,उपाध्यक्ष केशवराव मगर,महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अनुराधाताई नागवडे,कार्यकारी संचालक आबासाहेब जंगले,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष धनसिंग पाटील भोयटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के,दुध संघाचे अध्यक्ष सुरेश लोखंडे यांनी केले आहे.