Breaking News

अवैध धंदे चालकांचा सावेडीत भडका


 अहमदनगर । प्रतिनिधी । 05 -  शहरातील पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांचा व गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांचा अवैध धंदे चालकांवर वचक राहिला नसल्याने  अवैध धंदे शहरासह जिल्ह्यात बोकाळले आहेत. याच अवैध धंदे चालकांच्या वादाचा भडका प्रेमदान चौकातील एका मटका अड्ड्यावर उडला. जुन्या बुकीतील एका व्यक्तीने सुरु असलेल्या मटका बुकी चालकाला तलवारीने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरुन चार जणाविरुध्द भादवि 326,325,504,506,34 सह आर्मअ‍ॅक्ट 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी बुकी चालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुन्हा दाखल होताच घटनेतील आरोपी फरार झाले आहेत. 
या घटनेत कुणाल महेंद्र पोटे (रा.प्रेमदान हाडको,सावेडी) असे जखमीचे नाव आहे. सागर अडसुळ, गणेश अडसुळ, मनोज अडसूळ व राजू दत्तात्रय जाधव अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी कुणाल राजेंद्र पोटे यांचे प्रेमदान चौकात टपरी आहे. या टपरीवर मटका बुकीचे काम चालत असल्याचे सांगण्यात आले. मटका बुकी घेण्याच्या व बुकीतील पैशाच्या देण्या-घेण्यावरून 30 डिसेंबर 2015 रोजी राजु जाधव व पोटे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यातून एकाने जाधव यांच्या अंगाला धारदार   शस्त्र लावले होते. सदर वाद दोघांकडील समर्थकांनी मिटविला होता. याच वादातून राजु जाधव यांना या घटनेचा राग होता. याच रागातून शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास चौकात पोटे यास जबर मारहाण करण्यात आली. पोटे यांच्या डोक्यात व नडखीवर गंभीर मार लागल्याने हाडे मोडली   आहेत. परिसरातील नागरिकांनी पोटे यास नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेची माहिती पोलिस निरीक्षक मोरे यांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर जखमी पोटे याचा रुग्णालयात जाऊन जबाब घेण्यात आला. त्यानंतर रविवारी सायंकाळी वरील चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत म्हटले की, जुन्या भांडणाच्या कारणा वरुन व मनात राग धरुन राजु जाधव यांच्या सांगण्यावरुन    वरील तिघांनी तलवारीने    मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. असे म्हटले आहे. अधिक तपास महिला फौजदार शिरदावडे करीत आहेत.