Breaking News

आडगावला थट्टा-मस्करीतून मित्राचा खून



 नाशिक/प्रतिनिधी। 5 -   तीन मित्रांमध्ये थट्टा-मस्करी सुरू असतानाच, त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि एकाने चिडून दुसर्‍या मित्राच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर तिसर्‍यालाही मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. 
सदरची घटना आडगाव परिसरात रविवारी पहाटे अडीच-तीनच्या सुमारास घडली. आडगाव पोलिस ठाण्यात यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडगाव शिवारातील प्रताप हॉटेलमध्ये तिघेही वेटर म्हणून कामास होते. रात्री अडीच्या सुमारास अनिल गोपाळप्रसाद गुप्ता (32, मूळ रा. पटणा, बिहार) व प्रेम खुशीलाल पासवान (26, मूळ रा. बिहार) हे झोपलेले असताना संशयित उदय भारती उर्फ बाबा (मूळ रा. अलाहाबाद) हा दारु पिऊन आला आणि त्याने दोघांना मारहाण करणे सुरू केले. यात प्रेम पासवान हा पळून गेल्यानंतर संशयिताने अनिल गुप्ताच्या डोक्यात लाकडी दांडग्याने प्रहार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  घटनेनंतर संशयित उदय भारतीही फरार झाला असून प्रेम पासवान याच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला 

आहे. पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, आडगाव पोलीस 

ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पवार पुढील तपास करीत आहेत.