Breaking News

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांनी नाउमेद होवू नये : अ‍ॅड. काकडे

 अहमदनगर । प्रतिनिधी। 31 - केवळ आर्थिक परिस्थितीमुळे इच्छा असूनही अनेकांना चांगले शिक्षण घेता येत नाही. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर जगण्याबरोबरच शिक्षणाचाही प्रश्‍न उभा राहिला आहे. अशा संकटकाळात या विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहून त्यांना उमेद मिळणे गरजेचे आहे. दुष्काळग्रस्त, निराधार तसेच गरजू विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण मंडळ आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.विद्याधर काकडे यांनी केले. मंडळातर्फे दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक दुर्बल, निराधार व गरजू  अशा 9 विद्यार्थ्यांना 54 हजार 780 रूपयांची रोख मदत करण्यात आली. या मदतीच्या वितरण कार्यक्रमावेळी अ‍ॅड.काकडे बोलत होते. राष्ट्रीय पाठशाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास जि.प.सदस्या हर्षदा काकडे, संस्थेचे विश्‍वस्त प्रा.डॉ.एम.बी.मेहता, जगन्नाथ बोडखे, गणेश काथवटे, प्रविण उकिरडे, रामनाथ घनवट, आबासाहेब बेडके, वसतिगृह अधीक्षक बाबासाहेब पातकळ, संजय बोबडे, महेंद्र विघ्ने, प्रा.भागवत राशीनकर आदी उपस्थित होते. 
अ‍ॅड.काकडे पुढे म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येत असतात. मात्र अशा संकटांचा धीराने सामना करण्याची गरज आहे. संघर्षातून मिळणारे यश नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी असते. राष्ट्रीय शिक्षण मंडळ दरवर्षी 9 गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात देणार आहे. येथील वसतिगृहात सर्वसामान्य कौटुंबिक पार्श्‍वभूमी असलेले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी भविष्यात विविध रोजगाराभिमुख कोर्स सुरू करण्याचा मानस असल्याचे अ‍ॅड.काकडे यांनी सांगितले. प्रा.डॉ.मेहता म्हणाले, शिक्षण क्षेत्रात संस्थांनी विद्यार्थी हित नेहमीच डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये या भूमिकेतून काम होणे आवश्यक असून राष्ट्रीय शिक्षण मंडळाने खर्‍या अर्थाने दिशादर्शक काम केले आहे. प्रा.लक्ष्मण बिटाळ यांनी सूत्रसंचालन केले. जगन्नाथ बोडखे यांनी आभार मानले. 
आर्थिक मदत मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सागर दत्तात्रय पुरनाळे (रा.भगूर, ता.शेवगाव), विनोद संजय जगधने (रा.घोटण, ता.शेवगाव), पूजा भगवान बडे (रा.मडके, ता.शेवगाव), अभय शिवाजी पवार (रा.हिंगणगाव, ता.शेवगाव), साक्षी नानासाहेब शेळके (रा.वाघोली, ता.शेवगाव), रोहिणी अर्जुन वडघणे (रा.मडके, ता.शेवगाव), रोहित रामकृष्ण पुरनाळे (रा.भगूर, ता.शेवगाव), हौसिराम सुरेश पवार (रा.आव्हाणे, ता.शेवगाव), पल्लवी बाबासाहेब बुधवंत (रा.निबेनांदूर, ता.शेवगाव) यांचा समावेश आहे. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.