Breaking News

शनिचौथर्‍यावर महिलांनीच बहिष्कार टाकावा - नागराज मंजूळे

अहमदनगर, 31 - शनिशिंगणापूरला महिलांना चौथर्‍यावर प्रवेश मिळत नसेल तर महिलांनीच शनीवर बहिष्कार टाकावा आणि मंदिरात जाऊ नये, असे आवाहन चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजूळे यांनी केले आहे. ते अहमदनगरच्या न्यू आर्ट्स कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी बोलत होते. 
पुरुषप्रधान संस्कृतीमुळे पुरातन काळापासून स्त्रियांना दोषी ठरवले जात असल्याचा आरोप मंजुळेंनी केला. तसेच स्त्री पुरुषापेक्षा उजवीच आहे, मात्र धर्मव्यवस्थेने आतापर्यंत स्त्रियांचे शोषणच केले आहे, असे मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. महाभारत, रामायणापासून स्त्रीलाच दोषी ठरवण्यात आले, त्यामुळे स्त्रियांनी व्यक्त होण्याची गरज नागराज मंजुळे यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, औरंगाबाद हायकोर्टाने अहमदनगर जिल्हाधिकार्‍यांना शनि शिंगणापूर प्रकरणी नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा चार आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत. औरंगाबादेतल्या डॉ. वसुधा पवार यांनी शनी चौथर्‍यावर महिलांना प्रवेश आणि पूजेचा समान अधिकार मिळावा यासाठी जनहित याचिका दाखल केली होती.