आत्मविश्वास वाढविणारी शिक्षण पध्दती हवी ः शरद पवार
सांगली, 12 - पारंपरिक शिक्षण पद्धतीबरोबरच नावीन्यपूर्ण उपक्रम स्वीकारायला हवेत. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढेल अशाप्रकारचे शिक्षण देण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी रविवारी सांगलीतील कार्यक्रमात केले. यंगमेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवाचा सांगता सोहळ्यावेळी ते बोलत होते.पवार पुढे म्हणाले की, मातृभाषा विस्तार आणि प्रचार महत्त्वाचा असला तरी, जागतिक पातळीवरची भाषाही आता अवगत केली पाहिजे. मातृभाषेकडे दुर्लक्ष करा, असे मी म्हणत नाही. दोन्ही भाषांचे बोट धरून पुढे गेले पाहिजे. इंग्रजीबरोबरच फ्रेंच, चायनिज अशा चार-पाच भाषा महत्त्वाच्या बनल्या आहेत. जागतिक पातळीवर जे बदल आता घडताहेत, ते स्वीकारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नवनव्या गोष्टींचा अंगिकार करण्याची तयारी केली पाहिजे. पोषक बदल स्वीकारण्याची मानसिकता तयार केली पाहिजे. बदलांबाबतचे औत्सुक्य तरुणांच्या मनात निर्माण होत आहे. त्यांच्यातील औत्सुक्याला बळ देण्याची गरज आहे स्त्री शिक्षणाविषयी ते म्हणाले की, ज्या देशांच्या प्रगतीत 50 टक्के महिलांचा हातभार लागला, ते पाश्चिमात्य देशच आज पुढारलेले आहेत. संरक्षणमंत्री म्हणून मी काम करीत असताना हवाई दलात एकही महिला पायलट नव्हती. त्यावेळच्या हवाईदल प्रमुखांना वारंवार मी याचे कारण विचारत होतो. महिलांना हवाई दलात घेता येत नसल्याचे त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले होते. शेवटी हवाई दलातील भरतीत टक्के महिलांना आरक्षण देण्याचे आदेश मी दिले.
प्रत्येकवर्षी यात 10 टक्के वाढीचाही निर्णय घेतला होता. हा निर्णय होण्यापूर्वी हवाई दलातील अपघातांचे प्रमाण अधिक होते. महिलांना हवाई दलात स्थान दिल्यानंतर बर्याच वर्षांनी मी हवाईदल प्रमुखांना सध्याच्या अपघातांचे प्रमाण विचारले. तेव्हा हे प्रमाण घटल्याचे दिसून आले. महिलांच्या हवाई दलातील सहभागामुळेच हा सकारात्मक परिणाम दिसून आला.यावेळी जयंत पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
संस्थेच्या अध्यक्षा मेघना कोरे यांनी प्रास्ताविक, तर बापूसाहेब पुजारी यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष हणमंत पवार यांनी आभार मानले. यावेळी राजेंद्र यड्रावकर, उद्योजिका प्रभाताई कुलकर्णी, जयश्रीताई पाटील, लेफ्टनंट कर्नल हेमंत जोशी, सुलभाताई आरवाडे आदी उपस्थित होते.