Breaking News

ई-शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन प्रक्रियेत गतिमानता

 नाशिक/प्रतिनिधी। 25 -  शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या ई-शिष्यवृत्ती च्या ऑनलाईन प्रक्रियेत गेल्या काही दिवसापासून अनियमितता असल्याच्या तक्रारी समाज कल्याण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची प्रशासनाने दखल घेतली असून शिष्यवृत्ती ची ही ऑनलाईन प्रक्रिया सुरळीत करण्यात आली असून ही प्रक्रिया गतिमान झाली आहे. अशी माहिती प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक श्री.काशिनाथ गवळे यांनी दिली.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नाशिक विभागातील कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयांच्या अधिकारी व कर्मचारी यांची ई-शिष्यवृत्ती च्या ऑनलाईन प्रक्रियेतील समस्यांचे निराकरण करण्याबाबत एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या गंगापूर रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयात सदर कार्यशाळेचे शुक्रवार, दि.22 जानेवारी 2016 रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयंत पट्टीवार, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक श्रीमती वंदना कोचुरे, व मॉस्टेक कँपनीचे अधिकारी हर्षल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
काशिनाथ गवळे म्हणाले, नाशिक विभागात नागपूर खालोखाल विक्रमी असे ऑनलाईन अर्जांचा भरणा विद्यार्थ्यांनी केला आहे. ई-शिष्यवृत्ती संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणीमुळे काही विद्यार्थ्यांचे अर्ज भरले गेले नसतील अशा विदयार्थ्यांसाठी फेब्रुवारी 2016 पासून सर्व्हर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खुलं होणार आहे. एकही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही. यांची  दक्षता शासनाकडून घेण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी ऑनलाईन अर्जांचा भरणा केला नसेल अशा विद्यार्थ्यांना ही अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ई-शिष्यवृत्ती संकेतस्थळाच्या बाबतीत मागील काही दिवसापासून विविध संस्था, संघटनां, व महाविद्यालयांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. याची शासनाने दखल घेतली आहे. मा.मंत्री, सामाजिक न्याय ना.राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 15 जानेवारी 2016 रोजी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्या बैठकीतील चर्चेनुसार ई-शिष्यवृत्ती संकेतस्थळाच्या सर्व्हरच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. यापुढे नवीन विद्यार्थ्यांना अर्जांचा भरणा, महाविद्यालयांना शुल्क अद्यावत करणे आदी प्रश्‍न, समस्या उद्भवणार नाहीत. असेही काशिनाथ गवळे यांनी यावेळी सांगितले.
मॉस्टेक कँपनीचे प्रतिनिधी हर्षल कुलकर्णी यांनी यावेळी नवीन विद्यार्थ्यांना अर्ज भरतांना उद्भवणारे ओटीपी नंबर, सर्व्हर डाऊन होणे आदी महाविद्यालयांच्या शंकाचे समाधान केले. यावेळी धुळे सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली हिंगे, नंदुरबार सहाय्यक आयुक्त राकेश महाजन, जळगांव सहाय्यक आयुक्त राकेश पाटील , अहमदनगर सहाय्यक आयुक्त माधव वाघ , समाज कल्याण अधिकारी श्री.के.जी.बागूल आदी उपस्थित होते.