Breaking News

जन्म- मृत्यूची नोंद वेळेवर करा; ब्रिदवाक्याला हरताळ


 अहमदनगर । प्रतिनिधी । 06 (अशोक झोटिंग)-  जन्म-मृत्यूची नोंद वेळेवर करा, ते आपल्या हिताचे आहे, जन्म-मृत्यची  नोंदणी कायद्याने बंधनकारक आहे. या ब्रिदवाक्याला महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातंर्गत असलेल्या जन्म-मृत्य नोंदणी कार्यालयाने हरताळ फासला आहे. या कार्यालयातील वैद्यकिय अधिकार्‍यांसह कर्मचारी व विभागप्रमुख गेल्या आठ दिवसापासून गायब आहेत. तर कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांकडून नागरिकांना उडवा-उडवीची उत्तरे देण्यात येत असल्याने नागरिकांनी मंगळवारी दुपारी उपायुक्त बेहेरे यांच्याकडे संताप व्यक्त केला. उपायुक्त बेहेरे यांनी विभागातील सर्वच कर्मचार्‍यांना धारेवर धरले. कर्मचार्‍यांनीही नागरिकांबरोबरच उपायुक्तांनाही उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने ते संतापले. 
महानगरपालिकेच्या शहरातील जुन्या इमारतीमध्ये जन्म-मृत्य नोंद विभाग कार्यरत आहे. या कार्यालयात वैद्यकिय अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात येऊन त्यांच्या विभागाला सात ते आठ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. मात्र, या विभागाची आंधळ दळतय... या म्हणीप्रमाणे अवस्था झाली आहे. विभाग प्रमुखांचा कर्मचार्‍यांवर वचक राहिलेला नाही. कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात या संदर्भात नागरिकांनी अथवा जन्म-मृत्यू दाखला मागणार्‍यांनी विचारणा केली असता विभाग प्रमुख न्यायालयात गेले. तर कर्मचारी जनगणनेच्या कामावर आहेत. असे सांगतात. तर कार्यालयातील टेबलावर ‘तांत्रिक बिघाडामुळे कॉम्प्युटर बंद आहे, तरी सहकार्य करावे’ असा फलक गेल्या आठ दिवसांपासून झळकत आहे. तसेच दरवाजावर कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5.45, मध्यतंराची सुट्टी 2 ते 2.30, साप्ताहिक सुट्टीचा फलकही लावलेला आहे. जन्म-मृत्यूची नोंद करण्यासाठी येणार्‍या नागरिकांना मनपासमोरील माहिती व सुविधा केंद्रात अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अर्जात किरकोळ माहिती व अर्जंट दाखल्याच्या फीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यासाठी दोन व चार दिवसांचा कालावधी देण्यात येतो. याच विभागात पैसे भरुन घेण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. त्यानुसार मागणी करणार्‍या अर्जदाराला टोकन क्रमांकासह पोहोच पावती दिली जाते. पोहोच पावतीवर दाखला मिळण्याचे  ठिकाण अर्जाचा प्रकार, संपर्क अधिकारी लागणारा कालावधी जन्म-मृत्यूची नोंद असा मजकूर असतो.त्यात काही अटींची माहिती दिली जाते. व ब्रीदवाक्याची आठवणही नमुद केली जाते. मात्र, पोहोच पावती व टोकन क्रमांकानुसार कोणताही दाखला नागरिकांना दिला जात नाही. नागरिक दिलेली दिनांक व टोकन क्रमांक सांगून जन्म-मृत्यू नोंदणी विभागात वारंवार दाखल्यासाठी चकरा मारतात. मात्र, कोणतेही ठोस उत्तर 10 ते 15 दिवसानंतरही दिले जात नाही. हा आत्तापर्यंतचा सर्वांंनाच अनुभव आहे. ही अवस्था विवाह नोंदणी विभागातही आहे. या कार्यालयाबरोबरच मनपाच्या इतर विभागात यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. एखाद्याचा अनैसर्गिक आपत्ती, अपघाती मृत्यू झाला तर त्याचे शवविच्छेदन हे शासकीय रुग्णालयात केले जाते. तेथे सविस्तर मयताची नोंदणी केली जाते. सदर दाखला हा संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांना व महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे पाठविला जातो.त्या नोंदीनुसार संबंधित इसमांच्या नातेवाईकांना दाखले देण्याची व्यवस्था आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे.
माहिती व सुविधा केंद्राकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात असल्याचे दिसून आले. अर्जंट दाखल्यासाठी फी घेतली जात असली तरी इतर सर्वसाधारण दाखल्याच्या वेळेप्रमाणेच दाखले दिले जातात. सदर आकारण्यात येणारी ही फी किरकोळ असली तरी हा भुर्दंड नागरिकांनाच बसतो. सर्वसाधारण वेळेनुसार रुपये 10 तर अर्जंट दाखल्यासाठी 20 रुपये फी आकारण्यात येते.  सदर विभागाचे काम 1 जानेवारीपासून ऑनलाईन प्रक्रियेने करण्याचे ठरले. मात्र, या प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रणा व कर्मचारी संबंधित विभागाकडे उपलब्ध नाही. या विभागातील काही कर्मचार्‍यांना या प्रक्रियेसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, प्रक्रियाच व्यवस्थीत राबविण्यात न आल्याने प्रक्रियेचा बोजवारा उडाला आहे. अधिकार्‍यांनाही ही प्रक्रिया पाच दिवसांपासून बंद असल्याचे माहित नाही. अथवा ऑपरेट करणार्‍या कर्मचार्‍यांनीही माहिती वरीष्ठांना न दिल्याने प्रक्रियेतील गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. 
 मनपा उपायुक्त कर्मचार्‍यांवर संतापले
जन्म-मृत्यूची नोंद करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी संबंधित विभागात वारंवार चकरा मारुनही जन्म-मृत्यूचे दाखले मिळत नसल्यामुळे विभागातील कर्मचार्‍यांवर प्रश्‍नांचा भडीमार केला. उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने नागरिक कर्मचार्‍यांवर संतापले. हा प्रकार नागरिकांनी नगरसेवक आरिफ शेख यांच्यामार्फत उपायुक्त बेहेरे यांच्या कानावर घालून तक्रारदारांनी बेहेर यांचे कार्यालय गाठले. त्यानंतर उपायुक्तांना खरा प्रकार समजला. उपायुक्त बेेहेरे यांनी जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील कर्मचार्‍यांना बोलावून ‘काय प्रकार आहे’ अशी विचारणा केली, त्यानंतर सर्व खरा प्रकार समोर आला. त्यानंतर बेहेरे यांनी संबंधित विभाग प्रमुखांसह कर्मचार्‍यांना धारेवर धरुन सदर प्रश्‍न तातडीने सोडवा, अन्यथा कारवाई करु. असा इशारा दिला. त्यानंतर 
तक्रारदारांचे समाधान झाले.