Breaking News

बालगंधर्व संगीत महोत्सवात शास्त्रीय संगीताची मेजवानी


 जळगाव/प्रतिनिधी। 10 -  नव्या वर्षात टाकलेले पाऊल आणि बालगंधर्व संगीत महोत्सवाची चाहुल, यांचा सुरेल संगम आता जळगावच्या रसिकांच्या परिचयाचा झाला आहे. प्रती वर्षाप्रमाणे बालगंधर्व संगीत महोत्सवात यावर्षीदेखील शास्त्रीय संगीतातल्या उत्तुंग प्रतिभेचा आविष्कार घडणार याची रसिकांना खात्री होतीच, आणि अर्थात पं. कलापिनी कोमकली यांच्या स्वर वर्षावाने या विश्‍वासाचे समृद्ध अशा अनुभूतीत रूपांतर केले. 
बालगंधर्व संगीत महोत्सवाचे प्रथम सत्र पं. कुमार गंधर्व आणि पं. वसुंधरा कोमकली यांच्या प्रयोगशील गायकीचा वारसा लाभलेल्या पं. कलापिनी कोमकली यांनी विलक्षण रंगविले, गाजविले आणि क्षणाक्षणाला रसिकांना गंधर्वीय गायकीचा प्रत्यय दिला. परंपरा आणि प्रतिभा पं. कलापिनी यांनी आपल्या मैफिलीचा प्रारंभ कल्याण रागाने के ला. ’देवो दान मोहे’ या विलंबित एकतालातील बंदिशीतून कल्याण रागाचे मूर्तिमंत भावशिल्प रसिकांसमोर साकारले. स्वर आणि लय यांचा सुसंवाद, रागाचा भाव व्यस्त करणारा सुस्पष्ट सूर यातून कल्याण रंगला. यानंतरची त्रितालाची बंदिशही देखणी झाली. तर ’सांझ भई’ ह्या कल्याण रागाच्याच द्रूत एकतालाच्या बंदिशीला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पं. कलापिनी यांनी यानंतर तिलककामोद रागातील ’तीरथ को सब करे’ ही झपतालातील लोकप्रिय बंदिश सादर केली. त्यापाठोपाठ पं. कुमार गंधर्व रचित ’चला चल चालला’ हा तराणा सादर करून मैफिलीत अधिक रंग भरला. या तराण्यातून त्यांनी आपल्याला लाभलेला वारसा स्वत:च्या प्रतिभेतून अधिक समृद्ध केला आहे, याचा प्रत्ययच जणू दिला. रसिकांच्या आग्रहाला आणि विनंतीला मान देऊन पं. कलापिनींनी संत तुकारामांचा ’लक्ष्मी वल्लभा’ हा अभंग सादर केला. ’मिश्र मोहिनी’ या रागात पं. कलापिनींनी मैफिलीची सांगता ’सुनता है ग्यानी’ या निर्गुणी कबीर भजनाने केली. तबला साथ संजय देशपांडे यांनी दिली तर संवादिनीची साथ अभिषेक शिनकर यांनी दिली. साधनेचा प्रत्यय देणारा धीरगंभीर स्वर, बुद्धिप्रधान स्वरविलास आणि कुमारजींची आठवण करून देणारी गायकी ही पं. कलापिनींच्या या सत्राची वैशिष्ट्ये ठरली.
द्वितीय सत्राबद्दल रसिकांच्या मनात विलक्षण उत्सुकता होती. सारंग कु लकर्णी हे उदयोन्मुख कलावंत, तीन पिढयांपासून संगीताचा वारसा लाभलेले. गायन, तबलावादन आणि सरोदवादन अशा क्रमाने सारंग यांचा सांगितिक प्रवास झालेला. अर्थातच त्यांनी त्यांच्या या प्रवासात विलक्षण नावीन्यपूर्ण प्रयोग केलेले असणार, याचा अंदाज रसिकांना होता. 
सारंग यांनी त्यांच्या मैफिलीत अर्थातच पारंपरिकतेपासून फ्युजनपर्यंत झालेला त्यांचा प्रवास उलगडला. मैफिलीचा प्रारंभ त्यांनी बागेश्री रागाने केला. आलाप, जोड, झाला यातून त्यांनी बागेश्री रागाची मूर्तिमंत भावप्रतिभा साकारली. सरोद वादनाच्या या सत्रात चारुदत्त फडके यांच्या तबल्याच्या साथीने विलक्षण रंग भरला. 
’नाद’ हा भारतीय संगीताचा प्राण मानला जातो. यालाच नवीन पिढी साऊंड असे नाव देते. मुळात संगीत ही वैश्‍विक भाषा आहे, असं आपण म्हणतो. भारतीय, पाश्‍चात्य संगीत असे त्यातही प्रकार आहेत. पण आपला नाद आणि वेस्टर्न म्युझिकमधील साऊंड या दोन्ही संकल्पना जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातून वैश्‍विक संगीताची निर्मिती होते. गिटार आणि सरोद यांच्या मिश्रणातून त्यांनी झी रॉड या वाद्याची निर्मिती केली.