Breaking News

श्याम बेनेगल यांना जीवनगौरव पुरस्कार


 पुणे (प्रतिनिधी) । 10 - ज्येष्ठ अभिनेते आणि कवि सौमित्र चॅटर्जी व प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा यंदाच्या 14 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
याबरोबर कलेच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल प्रसिद्ध संगीतकार उत्तमसिंग यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्ड’ जाहीर झाला असून अ‍ॅनिमेशन क्षेत्रात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राम मोहन यांना ‘डीएसके पिफ लाईफ टाईम अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड-2016 ईन अ‍ॅनिमेशन’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. हे सर्व पुरस्कार गुरुवार दि. 14 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता सिटी प्राईड, कोथरूड येथे होणार्‍या कार्यक्रमात प्रदान करण्यात येतील. अनेक मान्यवर व्यक्ती या वेळी उपस्थित असतील, असेही डॉ. पटेल या वेळी म्हणाले.
या वेळी बोलताना जब्बार पटेल म्हणाले की, पुणे आंतरराष्ट्र्रीय चित्रपट महोत्सवात दरवर्षी चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींचा सन्मान केला जातो. याही वर्षी ही परंपरा कायम ठेवत प्रसिद्ध अभिनेते व कवि सौमित्र चॅटर्जी आणि प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देत गौरव केला जाणार आहे. पुणेरी पगडी, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असेल. याबरोबरच प्रसिद्ध संगीतकार उत्तमसिंग यांना कलेच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्ड’ तर अ‍ॅनिमेशन विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राम मोहन यांचाही गौरव केला जाणार आहे.
या वेळी महोत्सवात दाखल झालेल्या मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागाच्या अंतिम फेरीत निवड करण्यात आलेल्या 7 चित्रपटांच्या नावाची घोषणाही डॉ. जब्बार पटेल यांनी केली.