केंद्र शासनाच्या निर्णयाने बैलगाडा चालक-मालक खुश
पुणे (प्रतिनिधी) । 10 - राज्यातील ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा झाली भिर्रर...चा आवाज घुमणार असून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी (दि.8) घेतल्या नंतर तमाम बैलगाडा शर्यतीवरील बंदीला स्थगिती मिळाल्याचे वृत्त याभागात येऊन धडकताच बैलगाडा चालक , मालकांनी व शौकीनांनी आनंद व्यक्त केला आहे.
क्रूएल्टी टू अॅनिमल कायद्यानुसार बैलगाडा शर्यतीवर आणलेल्या बंदीमुळे नाराज झालेल्या गाडा मालकांनी आंदोलने केली होती. यात शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी मागील काही वर्षांपासून बैलगाडा शर्यती सुरु व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता त्याच प्रमाणे न्यायालयीन लढा दिला होता. उत्तर पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक संघटनेच्या शिष्टमंडळाने आणि सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी , पदाधिकारी आणि बैलगाडा मालकांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत त्यांना साकडे घातले होते. अखेर सर्वच लोकप्रतिनिधी व शेतक-यांच्या मागणीचा रेटा आणि शासनाची सकारात्मक भूमिका यामुळे या शर्यती पुन्हा सुरु करण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे.
यात्रांची उत्कंठा पुन्हा वाढणार:
ग्रामीण भागात गावागावात कुल देवतेच्या यात्रांदरम्यान कित्येक वर्षांपासून शर्यती होत आहेत .गेल्या काही वर्षात अशी अनेकवेळा बंदी आली पण कधी विरोधी तर कधी सत्ताधारी राजकीय पक्षांनी बंदी विरोधात पुढाकार घेतला असल्याचे दिसून आले आहे. या शर्यती म्हणजे ग्रामीण भागात मोठी उलाढाल असते. मोठ्या प्रमाणावर खरेदीविक्री होते तसेच अनेकांना या काळात रोजगारही मिळतो, गावातील व्यवसाय वाढतो व त्यामुळेच अद्यापही शर्यतींची लोकप्रियता अफाट आहे. गावोगावीच्या यात्रा जत्रांचा हंगाम तोंडावर असताना बंदी उठविण्यात आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
शेतकर्यांना न्याय मिळाला : आमदार सुरेश गोरे
याबाबत खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी सांगितले की, केंद्र सरकारने एक चांगला निर्णय घेत बैलगाडा मालकांना दिलासा दिला आहे. मात्र केंद्र शासनाने अशा शर्यती भरविताना काही निर्बंध घालून दिलेले असून त्यांचे पालन होण्याची गरज आहे. यात्रा - जत्रांमध्ये शर्यती व्हाव्यात मात्र मागील काही काही काळात नेत्यांच्या- कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा बैलगाडा शर्यती भरविल्या जात होत्या तसे प्रकार पुढे होऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त करून आमदार गोरे म्हणाले कि, बैलांची शेतकरी काळजी घेतात. त्यांना प्रेमाने सांभाळतात. शर्यतीसाठी धावणार्या बैलांची तर विशेष काळजी घेतली जाते. या बंदीमुळे शेतकर्यांमध्ये नाराजी होती. बंदी उठवावी म्हणून या भागाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. शेतकर्यांनी आंदोलने केली होती. अखेर ही बंदी उठविण्यात आल्याने शेतकर्यांना न्याय मिळाला आहे.
चाकणचा बैल बाजार पुन्हा गजबजणार :
बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्यानंतर व गोहत्या बंदी नंतर चाकण मधील सर्वात मोठ्या गुरांच्या बाजारात बैलांच्या किमती कमी झाल्या होत्या. आवकावरही परिणाम झाला होता. शर्यतीचे बैल केवळ शोभेचे झाले होते. बैलगाडा शर्यत बंदीला स्थगिती मिळाल्यानंतर चाकण मधील बैल बाजारात कमी झालेले बैलांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार वाढणार आहेत.