Breaking News

चार्वाकाचा विचार मारण्याचा प्रयत्न अयशस्वी


 नाशिक/प्रतिनिधी। 5 - चार्वाकाचा विचार तर्क व अनुभवावर आधारित म्हणजेच विज्ञानाधिष्ठित असून, तो मारण्याचा, त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सनातन्यांकडून अनेक शतकांपासून झाला; मात्र आगामी काळ विज्ञानाचा असल्याने चार्वाकाचा विचार टिकून राहील, असे मत ज्येष्ठ विचारवंत तथा ’लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी मांडले. 
कै. प्रमिलाबाई मिरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित मिरजकर स्मृती समारोहात द्वादशीवार बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी ’चार्वाक दर्शन’ हा विषय उलगडून सांगितला.  ते म्हणाले, चार्वाकाला ’तत्त्वज्ञान’ वा ’दर्शन’ नव्हे, तर ’फिलॉसॉफर’ शब्द लागू पडतो. तत्त्वज्ञानात श्रद्धाभाव असतो, तर फिलॉसॉफी शंकेतून जन्माला येते.  चार्वाक हा शंकेखोर होता. धर्म नेहमी चिकित्सा नव्हे, श्रद्धा मागत असतो. श्रद्धेने प्रश्‍न सुटत नाहीत, तर त्यांचा विसर पडतो. जगाच्या प्रारंभीच्या काही शतकांवर ईश्‍वर, नंतर धर्मसंस्थापक, सम्राटांची मुद्रा अंकित होती. त्यानंतरचा काळ संत-समाजसेवकांचा होता.