Breaking News

सांगलीत रविवारी मॅरेथॉन स्पर्धा


सांगली ः दि. 5 - भारती विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती आमदार डॉ. पतंगराव कदम आणि कार्यवाह डॉ. विश्‍वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता.10) सकाळी 7 वाजता रन फॉर हार्ट या भारती हॉस्पिटल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी दिली.
ते म्हणाले,भारती हॉस्पिटलच्या कॅथलॅब विभागामध्ये गेल्या वर्षात एक हजारांहून अधिक यशस्वी अँजिओप्लास्टी झाल्या असून त्यानिमित्त रन फॉर हार्ट या थीमवर ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. पुरुषांच्या 21 कि.मी.अंतराच्या खुल्या गटासाठी अनुक्रमे एकवीस हजार, पंधरा हजार, दहा हजार आणि पाच हजारांची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे आहेत. महिलांच्या 9 कि.मी. अंतराच्या खुल्या गटासाठी अनुक्रमे नऊ हजार, सात हजार, पाच हजार आणि दोन हजार व एक हजार पाचशेची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे आहेत. या  शिवाय मुलांच्या 16 ते 19 वयोगट, ज्येष्ठ नागरिकांचा गट आदी विविध गटांत स्पर्धा होणार आहे. प्रवेश मोफत आहे. स्पर्धा भारती हॉस्पिटलपासुन सुरू होणार आहेत. नाव नोंदणी भारती हॉस्पिटल येथे सुरू आहे. याशिवाय विद्यापीठाच्या जिल्ह्यातील विविध  शाखांमध्ये 6 ते 13 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. कदम यांनी दिली.  मोफत सर्वरोग निदान शिबिरे, मतिमंद व मूक-बधिर शाळेतील मुलांना साहित्याचे वाटप, विश्‍वव्हिजन 2016, राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा, संगणक साक्षरता शिबिर, चलत व्यवसाय शिक्षण मार्गदर्शन मेळावा, असे कार्यक्रम होतील. 
सांगलीसह पतंगराव कदम महाविद्यालयाच्यावतीने एकदिवसीय साहित्य संमेलन, दंत महाविद्यालयाच्यावतीने लहान मुलांसाठी दातांवरील संपूर्ण उपचार मोफत केले जातील. ऑर्थोडेंटीक उपचारांसाठी पन्नास टक्के सवलत आणि तोंडाच्या कॅन्सरसाठी जागृती कँप होईल. कडेगाव, विटा, पलूस, अंबक येथे विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन केले आहे.