Breaking News

नेहरु भाजी मंडई व्यापारी संकुलाचा विषय पुन्हा चर्चेत

 अहमदनगर । प्रतिनिधी । 29 -  गत पाच वर्षापासून प्रलंबित असलेला नेहरू भाजीमंडई व्यापारी संकुलाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तीन वर्षापासून रेडीरेकनरचे दर वाढत असताना शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या 11 गुंठे जागेचा दर मात्र महापालिका प्रशासनाने घटविला आहे. दोन कोटी 11 लाख रुपयांना ही जागा विकसकाला दिली जाणार आहे. नगररचना विभागाने तयार केलेल्या या प्रस्तावाला मात्र वरिष्ठांनी आक्षेप नोंदविला आहे. 
चितळे रस्त्यावर महापालिकेची 11 हजार चौफूट जागा आहे. पाच वर्षापूर्वी येथील भाजी मार्केट पाडण्यात आले. तेथे भाजीमंडई व व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थसहाय्य करा, बांधा आणि हस्तांतरण करा (एफबीटी) नुसार निविदा मागविण्यात आली. त्यावेळी प्रिमियमची रक्कम साडेचार कोटी रुपये दर्शविण्यात आली. मात्र विकसकांनी एका निविदेला प्रतिसाद दिला नाही. तत्कालीन महापौर शीला शिंदे यांनी एफबीटी अथवा महापालिकेने व्यापारी संकुल उभारण्याचा ठराव महासभेत पारीत केला. प्रशासनाने मात्र त्यावर काहीच कार्यवाही केली नाही. तत्कालीन महापौर संग्राम जगताप यांनी बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल उभारण्याची घोषणा केली. 2 कोटी 24 लाख रुपयांचा प्रिमियम त्यासाठी निश्‍चित करण्यात आला. काही नगरसेवकांच्या आक्षेपानंतर खासगी व्हॅल्युअरला दर निश्‍चित करून देण्याचे पत्र दिले. मात्र खासगी व्हॅल्युअरने त्यास नकार दिला. तेव्हापासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे. 
आता नगररचना विभागाने पुन्हा प्रस्ताव तयार केला आहे. रेडीरेकनरनुसार हा दर निश्‍चित केल्याचे नगररचना विभागाकडून सांगण्यात आले.