Breaking News

जि.प. समाज कल्याणवतीने पाच योजना राबविणार ः सभापती चकोर


 अहमदनगर । प्रतिनिधी । 23 -  जिल्हा परिषदेच्या ’स्व’ उत्पन्नापैकी 3 टक्के निधीतून राबवण्यात येणार्‍या योजना राज्य सरकारने प्रत्येक जिल्हा परिषदेला निश्‍चित करून दिल्या आहेत. यातून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीने गुरूवारी पाच योजना अंतिम केल्या असून त्याच योजना पुढील वर्षीपासून राबवण्यात येणार असल्याची माहिती सभापती मीरा चकोर यांनी दिली. 
जि.प. स्व उत्पन्नातून 3 टक्के निधी समाजकल्याण समितीतून अपंग कल्याण योजना राबवण्यात येते. राज्यात प्रत्येक जिल्हा परिषद या निधीतून वेगवेगळ्या योजना राबवत होती. या योजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी सामूहिक, वैयक्तिक, कर्णबधिर व्यक्तींसाठीच्या योजना, अस्थिव्यंग असणार्या व्यक्तीच्या योजना, कुष्ठरोग मुक्त अपंग व्यक्तीसाठीच्या 40 ते 50 योजनांची यादी अंतिम करून त्यातून 3 टक्के अपंग कल्याणासाठी राबवण्यास सांगितले आहे. समाजकल्याण समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात आवश्यक असणार्या योजना 3 टक्के अपंग कल्याण योजनेतून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यात अपंग व्यक्तींसाठी क्रीडा स्पर्धाचे आयोजन करणे, अपंगत्व प्रतिबंधात्मक पुनर्वसन व सोयी सुविधांचा प्रचार करणे, अपंग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानासाठी अर्थ सहाय्य देणे, अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय्य देणे, अपंग व्यक्तिंच्या विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे यांचा निश्‍चित केलेल्या योजनामध्ये समावेश आहे. बैठकीला सदस्य रावसाहेब साबळे, उज्वला शिरसाठ, तुकाराम शेंडे, मंदा गायकवाड, गोरक्ष नेहे, संगीता गायकवाड, जयश्री डोळस, अनिता पवार, रामनाथ भुतारे, सुनंदा वाघ आणि समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले आदी उपस्थित होते.