‘कालिका’ व्यवस्थापकाची कारागृहात रवानगी, 12 लाखांचे अपहार प्रकरण
अहमदनगर । प्रतिनिधी । 23 - कालिका नागरी सहकारी पतसंस्थेत 11 लाख 43 हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे लेखापरिक्षणात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पतसंस्थेचा व्यवस्थापक सोमेश्वर गोपाळराव डिक्कर (रा.कोर्टगल्ली,नगर) यास गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे. त्यास शुक्रवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले असता 18 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुदत संपल्याने आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एमसीआर दिला. मात्र, न्यायालयाने एमसीआरमध्ये जामीनासाठी दिलेला अर्ज फेटाळल्याने आरोपी डिक्कर याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
येथील प्रमाणित लेखापरिक्षक सोमनाथ बाबुराव सोनवणे (रा.भिस्तबाग नाका, छत्रपती कॉलनी, पाईपलाईन रस्ता, नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 4 जानेवारी 2007 ते 31 मार्च 2013 दरम्यान हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. याबाबत पोलिससुत्रांकडून समजलेली माहिती अशी, व्यवस्थापक सोमेश्वर डिक्कर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश तालुका उपनिबंधक यांनी लेखापरिक्षक सोनवणे यांना दिले होते. त्यानुसार लेखी अर्ज, उपनिबंधकाचे आदेश यांच्यासह पोलिस अधिक्षक पोलिस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. पोलिस अधिक्षक यांनी अर्जावर अभिप्राय देऊन अर्ज आर्थिक गुन्हे शाखेकडे अवलोकनासाठी पाठविला. आर्थिक गुन्हेशाखेच्या अभिप्रायानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपी सोमेश्वर डिक्कर यांच्या विरुध्द (20/2016) भादवि.406,409,418,420, 477 (अ)प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार करेवाड हेकॉ. ससाणे , घुंगासे, शेख, महिला पोलिस गायकवाड, यांच्या पथकाने आरोपी डिक्कर याला सापळा लावून कोर्टगल्लीतील घरी पकडले. यावेळी आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांना अरेरावी केली. महिला पोलिसांनी कुटूंबाला शांत केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मालमत्ता ठेवीदारांची व्याज रक्कम जमा दाखवून मूळ ताळेबंद जुळवून येणे कर्जाची शिल्लक शुन्य म्हणून दाखविली. मूळ ताळेबंद जुळवून काही ठेवीदारांच्या नावे शुन्य शिल्लक दाखवून कर्जवाटप केले. तसेच काहींना चुकीच्या पध्दतीने व्याजमाफ केले. अशी पध्दतीने गैरव्यवहार करुन पतसंस्थेतील 11 लाख 43 हजार 687 रकमेची अफरातफर केली.
व्यवस्थापकाने केलेला गैरव्यवहार लेखापरिक्षणात उघडकीस आला. फिर्यादित म्हटले की, आरोपी डिक्कर हे पतसंस्थेत व्यवस्थापक असतांना त्याने त्याच्याकडे विश्वासाने सोपवलेली मालमत्ता व ठेवीदाराची व्याज रक्कमा जमा दाखवून ताळेबंद जुळवून येणे, कर्ज शुल्लक शुन्य दाखवून ठेवीदार गोरखनाथ शंकरराव सुद्रिक यांचे व त्यांचे कुटूंबाचे सदस्यांचे नावे असलेली ठेवीवरील व्याज सवलत ठेवीदारास देऊन संस्थेची आर्थिक फसवणूक करुन निधीचा अपहार केला आहे. तसेच ठेवीदार संजय फुलचंद गांधी व संतोष फुलचंद गांधी यांनी ठेवलेल्या रक्कमेवर कर्ज घेतले व सदरची रक्कम सुशिलाताई फुलचंद गांधी यांच्या नावावर वर्ग करुन मुळ कर्ज व व्याज संस्थेचे व्यवस्थापक यांनी भरुन घेतले नाही. व रक्कमेचा अपहार करुन सदर कर्जदारास कर्ज
व व्याज भरण्याबाबत कोणतीही नोटिस अथवा सुचना दिली नाही. व कर्ज भरुन आरोपी याने संस्थेची फसवणूक केली असे म्हटले आहे. आरोपी डिक्कर यास अटक करुन दि.15 रोजी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधिश तोडकर यांनी आरोपीस दि. 18 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. मुदत संपल्याने आरोपीला न्यायालयासमोर उभे करण्यात आले. त्यानंतर न्यायालयारने तपासी अधिकारी व सरकारी वकील यांना म्हणणे मांडण्यास सांगितले. तपासी अधिकार्यांनी युक्तीवादात आरोपीला जामीन मंजूर झाला तर गुन्ह्याच्या कामकाजावर अथडळा निर्माण होईल. असे सांगितले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपीची सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक
मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन करेवाड व हेकॉ.सासणे करीत आहेत.