प्रेक्षकांच्या टाळ्या हीच खरी कमाई : सोनाली कुलकर्णी
अहमदनगर । प्रतिनिधी । 23 - रंगभूमीवर कला सादर करताना मिळणार्या प्रेक्षकांच्या टाळ्या हीच खरी कमाई आहे, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले.
अनुष्का मोशन प्रायोजित व महावीर प्रतिष्ठान आयोजित अहमदनगर महाकरंडक स्पर्धेचे उद्घाटन सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते गुरुवारी येथील माउली सभागृहात झाले. यावेळी अहमदनगर महाकरंडकचे अध्यक्ष तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आ. संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, सिनेअभिनेत्री केतकी माटेगावकर, दिग्दर्शक सुजय डहाके, आशाताई फिरोदिया, परीक्षक अमित भंडारी, हेमांगी कवी, प्रवीण तरडे आदी उपस्थित होते. सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, नगरकरांचे कलाप्रेम, कला वृद्धिंगत करण्यासाठी असणारी तळमळ, नवीन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देतानाच कलाकार घडविण्यासाठी होणारी धडपड कौतुकास्पद आहे. एकांकिका, नाटकामधूनच आतापर्यंत स्टार घडले आहेत. मीही त्याला अपवाद नाही.
पुण्यातील फग्यरुसन महाविद्यालयात असताना पुरुषोत्तम एकांकिका करंडक स्पर्धेत मिळालेले पारितोषिक माझ्यासाठी आजही तितकेच महत्वाचे आहे. मी कोणीही नसताना मला एकांकिका स्पर्धेतूनच ओळख मिळाली, माझ्या कलेला खरी दाद तेथेच मिळाली. म्हणूनच एकांकिका स्पर्धेतूनच चंदेरी दुनियेतील उद्याचे तारे घडतील. स्टेजवरील कलेला मिळणारी दाद हीच कलाकाराची खरी कमाई असते. चित्रपट, नाटक यांचा दर्जा आजही तितकाच समान मानला जातो. या स्पर्धेतून दज्रेदार लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ पुढे येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नरेंद्र फिरोदिया म्हणाले, कलाकारांसाठी अहमदनगर महाकरंडक ही स्पर्धा खरी स्टार्टअप आहे. या स्पर्धेत एकांकिकामधून मांडलेल्या चांगल्या संकल्पनांना रुपेरी पडद्यावर घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. चंदेरी दुनियेत व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नवीन संकल्पना, चांगले तंत्रज्ञ, दज्रेदार कलाकारांचा आम्ही शोध घेत आहोत, असे फिरोदिया यांनी सांगितले. प्रास्तविक हर्षल बोरा यांनी केले. दरम्यान, रविवारी लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे, मनिषा कोरडे हे लेखन कौशल्य आणि दिग्दर्शनातील बारकावे यांचे धडे कार्यशाळेतून स्पर्धकांना देणार आहे.