Breaking News

रोहित आत्महत्या प्रकरण; राहुल गांधी हैदराबादमध्ये उपोषण

हैदराबाद, 30 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी उपोषणाला बसणार आहेत. विद्यार्थ्यांच्या
पाच मागण्या आहेत, त्यासाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी शुक्रवारी रात्री हैदराबादला पोहोचले. शनिवारी रोहितचा जन्मदिन होता.
राहुल गांधी यांच्यासोबत रोहितची आई देखिल एक दिवसीय उपोषण आंदोलनात सहभागी होणार आहे. रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर तिसर्‍याच दिवशी राहुल हैदराबादेत दाखल झाले होते. त्यांनी रोहितच्या कुटुंबियांची भेट घेऊन आंदोलकांशी संवाद साधला होता. याशिवाय इतरही पक्षांचे नेते हैदराबादला पोहोचले होते.
 काँग्रेस महासचिव दिग्विजयसिंह यांनी शुक्रवारी सांगितले, की राहुल गांधी कँडल मार्चमध्ये सहभागी होतील आणि विद्यापीठ परिसरात उपोषणाला बसणार आहेत. रोहित वेमुला या दलित स्कॉलरच्या आत्महत्ये प्रकरणी काँग्रेसने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्यासह कुलगुरु अप्पा राव यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. राहुल गांधी हैदराबादला पोहोचण्याआधी विद्यापीठ प्रशासनाने महत्त्वाचे बदल केले. प्रभारी कुलगुरु डॉ. विपिन श्रीवास्तव सुट्टीवर गेले आहेत. सूत्रांच्या 
माहितीनुसार, आता त्यांची जबाबदारी रसायनशास्त्राचे प्राध्यापक एम. पेरियास्वामी यांच्याकडे देण्यात आली आहे. कुलगुरु पी. अप्पाराव यांच्यानंतर वरिष्ठ प्राध्यापक श्रीवास्तव यांना प्रभारी कुलगुरु करण्यात आले होते.