चित्रकार ठाकूर यांचा गौरव भूषणावह ः फिरोदिया
अहमदनगर । प्रतिनिधी । 23 - भारतातील विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ अशा 100 कर्तबगार महिलांच्या यादीमध्ये अहमदनगरच्या महाराष्ट्र साहित्य परिषद, सावेडी उपनगर शाखेच्या सदस्या व ज्येष्ठ चित्रकार श्रीमती अनुराधा ठाकूर यांच्या समावेशामुळे शहराचा खर्या अर्थाने गौरव होऊन शहराचा लौकिक वाढला आहे. मसापच्या सावेडी उपनगर शाखेसाठी ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी केले.
मसापच्या सावेडी उपनगर शाखेच्या वतीने चित्रकार श्रीमती ठाकूर यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख कार्यवाह जयंत येलूलकर, पदाधिकारी सर्वश्री. नंदकिशोर आढाव, डॉ. व्ही. एन. देशपांडे, डॉ. सौ. सुनीता देशपांडे, सौ. स्नेहल उपाध्ये, सौ. शारदा होशिंग, कैलास दौंड, अमित झिरपे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. देशपांडे म्हणाले की, ठाकूर यांच्या चित्रांची शैली अद्भूत व वैशिष्ट्यपूर्ण आहे. आदिवासी गावांमधील त्यांनी चित्रांद्वारे दाखविलेली लोकसंस्कृती त्यांच्या चित्रांद्वारे परावर्तित होते. श्री. नंदकिशोर आढाव यांनी श्रीमती ठाकूर यांचे नाव भारतातील ज्येष्ठ चित्रकारांच्या यादीत समाविष्ट होणे,
ही घटना नगरसाठी भूषणावह आहे, असे सांगितले.यावेळी श्रीमती ठाकूर यांनी मसाप सावेडी शाखेच्या वतीने होणारा सत्कार माझ्यासाठी प्रेरणा देणारा असून, घरचा सत्कार हा पुरस्काराइतकाच अनमोल आहे. प्रास्ताविक जयंत येलूलकर यांनी केले. कोषाध्यक्ष सौ. स्नेहल उपाध्ये यांनी आभार मानले.