Breaking News

भारतनगरात दोन गटांमध्ये दंगल ः एका गटाकडून गोळीबार


 नाशिक । प्रतिनिधी । 05 -  मुंबई नाका परिसरातील भारतनगर झोपडपट्टीतील नंदिनीनगर येथील अनधिकृत झोपड्या पाडण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये दंगल झाली. एका गटाकडून गोळीबार करण्यात आल्याच्या अफवेने नागरिकांची एकच धावपळ उडाली. रविवारी दुपारी वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत परिसरात तणावाचे वातावरण होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई नाका परिसरातील भारतनगर येथील सर्व्हे नंबर 886 या सरकारच्या जागेवर काही लोकांनी बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे दहा बाय दहाच्या जागेची विक्री केली आहे. या जागेचा करार संपल्याने आकाश साबळे, फिलोमिना ऊर्फ आक्का यांच्यासह दहा ते पंधरा तरुणांनी जेसीबीच्या साहाय्याने पत्र्याचे शेड पाडण्याचा प्रयत्न केला. यास परिसरातील नागरिकांनी विरोध केल्यानंतर संशयित आकाश साबळे याने कारमधून येत दोन नागरिकांना एका वाहनास धडक दिली. या ठिकाणी शिवीगाळ करत जागा खाली केल्यास जिवे मारण्याची धमकी देत परिसरात दांडे हातात घेतलेल्या तरुणांसह दहशत निर्माण केली. याचवेळी अचानक सुमारे पाचशे नागरिकांच्या जमावाने त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. यामुळे हे दोन्ही गट समोरासमोर आले त्यानंतर दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक सुरू झाली.
ही दगडफेक सुमारे अर्धा तास सुरू होती. यामुळे परिसरात दहशत पसरली. याचदरम्यान, समोरील इमारतीमधून गोळीबार सुरू झाला तीन गोळ्या झाडण्याचा आवाज झाल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. तोपर्यंत इंदिरानगर मुंबई नाका ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच शीघ्र कृती दलाची एक तुकडी, भद्रकाली, गंगापूर, पंचवटी, इंदिरानगर, गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांशी संवाद साधला. दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर तणाव निवळला. काही नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधल्यानंतर परिसरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. एका नगरसेवकाचा संशयितांवर वरदहस्त असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आयुक्तांकडे केल्या, तसेच या भागात गुंडांची दहशत असून, अनैतिक व्यवहार सुरू असल्याच्या तक्रारीही केल्या. पोलिसांनी तत्काळ संबंधित इमारत पत्र्याच्या शेडमध्ये राहाणार्‍यांची चौकशी केली. 
रात्री उशिरापर्यंत 11 महिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. येथेली एका कुप्रसिद्ध ठिकाणी पोलिसांनी तपासणी केली, मात्र त्यांना काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, उपआयुक्त एन. अंबिका, श्रीकांत धिवरे, अविनाश बारगळ, सहायक आयुक्त रवींद्र वाडेकर, विजयकुमार चव्हाण, निरीक्षक मधुकर कड, बाजीराव महाजन, प्रकाश सपकाळे, शंकरराव काळे यांच्यासह सुमारे 250 पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात आहे.