Breaking News

मिरज तालुक्यातील 29 गावात पाण्यासाठी वणवण


सांगली ः दि. 5 - तालुक्यातील 29 गावांत वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. टंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. निवारणासाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडणे हा सध्या एकमेव मार्ग आहे.
एप्रिल ते जून या कालावधीत तीव्र पाणीटंचाई जाणवणार असल्याचा प्रशासनाचा नेहमीचा अंदाज असतो. 
मात्र यंदा अनेक गावांत आतापासूनच चार दिवसांतून एकवेळ पाणी उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे आरग, बेडग, भोसे, सोनी, एरंडोली, बेळंकी या मोठ्या गावांमध्ये फेब्रुवारीतच पाण्याचा दुष्काळ निर्माण होऊ शकतो. सिद्धेवाडी, डोंगरवाडी, तानंग कळंबी, शिंदेवाडी, करोली (एम) या गावांत वर्षानुवर्षे उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण सुरु असते. यंदाही तशीच परिस्थिती ंहोण्याची भीती आहे. शिंदेवाडी, खटाव, लिंगनूर या गावांनी भारतनिर्माण योजना राबवल्या आहेत. त्यांचा मुख्य जलस्त्रोत लिंगनूर पाझर तलाव आहे. तो तळाला गेला आहे.  म्हैसाळच्या पाण्यातूनच गेली पाच वर्षे तो भरला जात होता. यंदा मात्र परिस्थिती बिकट आहे. तानंगमध्ये पाण्याची टंचाई तीव्र आहे. तेथे तब्बल पंधरा वस्त्यांवरील अडीच हजार लोकसंख्येची वणवण सुरु होण्याच्या मार्गावर आहे. पाटगावमध्ये दीड हजार लोकसंख्येंसाठी टँकर आणि एक विहीर अधिग्रहणाची करावी लागेल. तालुक्यातील 35 हजार लोकसंख्येंला यंदाची टंचाई तुलनेने गंभीरपणे जाणवेल. लक्ष्मीवाडी, डोंगरवाडी, सिद्धेवाडी, कळंबी,  तानंग, पाटगाव, मल्लेवाडी आदी गावांत भटकंती सुरु झाली आहे. म्हैसाळचा उपसा यंदा चार-पाच महिने अगोदरच बंद झाला. त्यामुळे विहीरी, तलावांनी तळ गाठले आहेत. गतवर्षीपर्यंत फेब्रुवारी-मार्चपर्यंत उपसा सुरु असायचा.