Breaking News

वाळू माफियांच्या 40 बोटी जिलेटीनने उडवल्या; 2 कोटींचे नुकसान

पंढरपूर, 23 - वाळू माफियांना चाप बसवण्यासाठी इंदापूर परिसरात बारामतीच्या प्रांत अधिका-यांनी मोठी कारवाई केली. उजनीतल्या वाळू माफियांचे कंबरडे मोडून काढत तब्बल 2 कोटी रूपयांच्या वाळू काढण्याच्या 40 महागड्या बोटी जिलेटीन सहाय्याने उद्ध्वस्त करून टाकल्या आहेत. या ठिकाणी बारामती प्रांतधिकारांनी छापा टाकून वाळू माफियांचा अड्डा उद्ध्वस्त केला. तसेच 10 बोटीही जप्त करण्यात आल्या आहेत.
बारामती येथील प्रांत अधिकारी संतोष जाधव यांच्या पथकाने डाळज नंबर 1 आणि करमाळा तालुक्यातील कात्रज येथील या माफियांच्या अड्ड्यावर धाड टाकून पाण्यात वाळू उपसा करीत असलेल्या 40 बोटी थेट स्फोट करून उडवून दिल्या आणि पाण्यात बुडवून टाकल्या. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अंगावर वाळू वाहतुकीचा ट्रक घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि. 21) रात्री नऊच्या सुमारास गारअकोले येथे अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करताना महसूल पथकाला कारमधून आलेल्या चार ते पाचजणांनी शिवीगाळ करत धमकावल्याचा प्रकार घडला. तसेच पथकाच्या सरकारी वाहनाची चावीही काढून घेण्यापर्यंत मजल मारली.
याप्रकरणी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर चार वाहने जप्त केली आहेत. नीलेश मच्छिंद्र बोडके (वय 33, पिंपरी बुद्रूक, ता. इंदापूर) गणेश मच्छिंद्र बिचकुले (वय 26, गारअकोले, ता. माढा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. या दोघांना माढा न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. भीमानदीपात्रात अवैध वाळू तस्करी सुरू असल्याची खबर तहसीलदार सदाशिव पडदुणे यांना मिळाली. त्यांच्या आदेशानुसार सरकारी पथकाने गारआकोले येथील बजरंग आखाड्याजवळ भीमा नदीपात्रात गेले. तेथे जेसीबीच्या सहाय्याने वाहनांमध्ये वाळू भरत असल्याचे दिसले. पथक त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर वाळू तस्कर पळून जाऊ लागले.