Breaking News

शहरात 25 जानेवारीला चिंगारी ग्रुप आयोजित ‘बनाओ आपनी पहचान‘


 अहमदनगर । प्रतिनिधी । 11 - हजारो मैलांचा प्रवास जसा केवळ एका पावलाने सुरु होतो आणि इवलासा दिवा जसा अंधार दूर करतो,अगदी तसेच अंतर्मनाला प्रज्वलित करणारी प्रेरणेची इवलीशी चिंगारी’ देखील आपलं अवघंआयुष्य उजळून टाकू शकते. जीवनाला नवी दिशा देऊ शकते. हाच ध्यास आणि दृष्टीकोन मनी ठेऊन चिंगारी ग्रुपने बनाओ अपनी अलग पहचान’ हा एक प्रेरणादायी बिझनेस डेव्हलपमेंट सेमिनार येत्या 25 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता, नगरच्या माऊली सभागृहात आयोजित केला आहे.
या बिझनेस डेव्हलपमेंट सेमिनारमध्ये व्यवसायवृद्धी आणि यशस्वितेसाठी ट्रेनिंग देणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध मॅनेजमेंट गुरु राकेश जैन मार्गदर्शन करणार आहेत. 40 वर्षांहून अधिक समृद्ध अनुभव आणि देशविदेशातील बदलत्या व्यावसायिक तंत्रांची आणि प्रवाहाची अचूक जाण आणि अभ्यास असणारे इंदौरचे राकेश जैन हे प्रभावी मोटिव्हेटर म्हणून प्रसिद्ध आहेत.
चिंगारी ग्रुपच्या या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी व नगरकरांना व्यावसायिकतेचे नवे क्षितीज खुले करून देण्यासाठी अनेक सौजन्याचे हात पुढे आले आहेत. या बिझनेस डेव्हलपमेंट सेमिनारचे मुख्य प्रायोजकत्व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन यांनी स्वीकारले असून सहप्रायोजकत्व मिट्टीकूल-पॉवर व्हिजन, ए.एम.रीअ‍ॅल्टी, मिडास सुझुकी आणि योगीराज फर्निचर यांनी स्वीकारले आहे. आउटडोअर पार्टनर म्हणून चंगेडीया आउटडोअर्स प्रा.लि. यांनी सहयोग देऊन हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी बळ दिले आहे.
चिंगारी’ आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाची, नव्या स्वप्नांना, नव्या ध्येयांना, नव्या कल्पना विचारांनी अस्तित्वात आणण्याची.आयुष्यात यशासाठी योग्य दिशा मिळायला हवी ते काम दीपस्तंभाचे पण दीपस्तंभावरच अंधार असेल तर म्हणूनच अंधारात एक चिंगारीतून नवा मार्ग देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न.आज अनेकांना व्यवसाय करायचाय पण कसे करावे हे कळतच नाही? खरे तर जागा, भांडवल, अनुभव नसतानाही तंत्रज्ञानाच्या युगात नवे उद्योग, रोजगार निर्माण झाले आहेत. त्यांना शक्य झाले मग आपल्याला  का नाही? याचा शोध घेऊन सर्वाना  यशाचा मार्ग दाखविण्याचा चिंगारीचा शब्द व आत्मविश्‍वास आहे. सन 2016 च्या डिसेंबर पर्यंत नवीन 100 उद्योजक नव्या कल्पना वास्तवात आणून यशस्वी वाटचाल सुरु करतील यासाठी आम्ही एक मिशन म्हणून हा प्रकल्प हाती घेतला आहे.     
आपल्या नगरसाठी काहीतरी वेगळे करू इच्छिणार्‍या पाच युवामनांनी हि चिंगारी’ पेटवली आहे. वृत्तछायाचित्रकार श्री. जितेंद्र अगरवाल, कमर्शियल आर्टिस्ट व ब्रॅण्ड कन्सल्टंट श्री. ज्ञानेश शिंदे, चार्टर्ड अकौंटंट श्री. अमित फिरोदिया, फार्मास्युटीकल क्षेत्रातले श्री. सोमेश गायकवाड, आणि  सौ. प्रियांका पिसुटे यांनी एकविचाराने चिंगारी ग्रुप’ची स्थापना केली आहे. आमचा मुख्य उद्देश म्हणजे चिंगारी’ च्या माध्यमातून मोटिव्हेशनल सेमिनार्स व वर्कशॉप्स, पॅरेटिंग सेमिनार्स, उद्योजकता विकास असे विविध कार्यक्रम आयोजित करणे हा आहे. ज्यामुळे नवयुवकांना, व्यावसायिकांना, उद्योजकांना  आपापल्या क्षेत्रात नवी झेप घेण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि त्यांची आत्मशक्ती अधिक जागृत होईल.
मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करून वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी देखील उपक्रम राबविण्याचा चिंगारी ग्रुप’ चा संकल्प आहे. देश-विदेशातील सर्वोत्तम व्याख्याते, मार्गदर्शक आणि ट्रेनर नगरमध्ये आणण्याचा आराखडा आखलेला आहे. यामागे कुठलाही व्यावसायिक हेतू नसून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आणि नगरमध्ये सातत्याने काहीतरी नवनवे घडत राहावे हीच आमची प्रामाणिक अपेक्षा असून त्यासाठी आम्ही सर्व नगरकरांच्या आशीर्वादाने कायम प्रयत्नशील राहू, अशी माहिती चिंगारी ग्रुप’ ने दिली.