Breaking News

जिल्हा परिषदेच्या वतीने ‘2016 वरीस लेकीचा’ उपक्रम



 बुलडाणा (प्रतिनिधी) । 10 - जिल्हा परिषदेच्या वतीने मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत व्यापक जाणिव जागृती मोहिम हाती घेतली असुन सन 2016  वरीस लेकीचं हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने राष्ट्रीय बालिका दिन दिनांक 24 जानेवारी च्या औचित्यावर संपुर्ण जिल्ह्यात निबंध ,वत्कृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी दिली.
     महाराष्ट्रातील मुलींचा जन्मदर कमी असणा-या जिल्ह्यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश आहे. सामाजिकदृष्ट्या चिंताजनक असलेल्या या विषयावर मोठ्या प्रमाणावर सामाजिक चळवळ उभी करण्याची गरज आहे. ही गरज अधोरेखीत करीत बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी गेल्या वर्षभरापासुन बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाकडे आवर्जून लक्ष केंद्रीत केले आहे. त्या अनुषंगाने यापुर्वी ऑक्टोबर 2015 मध्ये संपुर्ण जिल्ह्यात आंतराष्ट्रीय बालिका दिनाच्या औचित्यावर महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान नविन वर्षाच्या आरंभापासुन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अलका खंडारे व मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांच्या पुढाकाराने सन 2016- वरीस लेकीचं हा लोकसहभाग आधारीत जाणिव जागृती चळवळीचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे.  या उपक्रमाचा प्रथम भाग म्हणुन 3 जानेवारी 2016 रोजी संपूर्ण जिल्ह्यातील 867 ग्रामपंचायती मधून विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सर्व शाळांमधून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. दुस-या टप्यात दि. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व व्यवस्थापनाच्या शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी निबंध, वकृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ह्या माध्यमिक / उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन स्तर अशा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. निबंध व चित्रकला स्पर्धा दि. 11 जानेवारी रोजी तर वकृत्व स्पर्धा 13 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होणा-या स्पर्धकांमधून प्रथम क्रमांकाच्या निबंध व चित्राची निवड गटशिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून तालुका स्तरावर केली जाणार असुन त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील प्रथम क्रमांक प्राप्त चित्र व निबंध जिल्हा स्तरावर संकलीत करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन दिपा मुधोळ यांनी केले आहे.