Breaking News

जिल्ह्यातील 363 गावांना 70 कोटींची मदत

सांगली ः दि. 21 - गतवर्षी कमी पावसाने खरीप पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 69 कोटी 91 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. यंदाच्या हंगामात केवळ 70 टक्के पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली 363 गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली. त्यांना हा निधी देण्यात येणार आहे., मात्र दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत वाढवण्यात आलेल्या 67 गावांबद्दल शासनस्तरावरुन निर्णय  झालेला नाही. पाऊस कमी झाल्याने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला. जिल्ह्यातील 363 गावांतील खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी 50 पैसेपेक्षा कमी आली होती. त्यामुळे ही गावे दुष्काळी म्हणून जाहीर झाली होती. त्यानंतर शासनाच्या आदेशाने दुष्काळी गावांची संख्या वाढली होती. यामध्ये जिल्ह्यातील 67 गावांचा समावेश होता. यात शिराळा तालुक्यातील 45, वाळवा तालुक्यातील 5 आणि कडेगाव तालुक्यातील 17 गावांचा समावेश करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष मदत मिळालेल्या गावांमध्ये या नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा समावेश करण्याबाबत शासनाकडून जिल्हा प्रशासनाला सूचना मिळालेल्या नाहीत. पुणे विभागीय आयुक्तांकडून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी 69 कोटी 91 लाख रुपये इतका निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.