Breaking News

17 जानेवारी, 21 फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण

पुणे (प्रतिनिधी), 12 - पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गेली वीस वर्षे पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचे यापूर्वी लसीकरण झाले असले तरीही रविवार, दिनांक 17 जानेवारी व 21 फेब्रुवारी, 2016 रोजी नजीकच्या पल्स पोलिओ बुथवर बालकांना पोलिओची लस पाजण्यासाठी घेऊन जावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मोहिमेमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाच वर्ष वयोगटातील सुमारे चार लाख एकोणीस हजार आठशे पंचावन्न लाभार्थींची नोंदणी करण्यात येणार आहे. 1995 पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविल्यामुळे जिल्ह्यात एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही. पोलिओ होऊ नये यासाठी 17 जानेवारी व 21 फेब्रुवारीला आयोजिलेल्या मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे.
18 जानेवारी, 2011 नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची नोंदणी 13 ते 16 जानेवारी या कालावधीत आरोग्य कर्मचा-यांमार्फत गाव पातळीवर करण्यात येणार असून उसतोड कामगार, वीट भट्टी कामगार, बांधकाम व रस्त्याची कामे करणारे मजूर यांच्या मुलांच्या नोंदणी करण्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप यांनी दिली. पल्स पोलिओ लसीकरणासाठी जिल्ह्यात एकूण 4095 केंद्रे कार्यरत करण्यात येणार आहेत. साखर कारखाने, महामार्गावरील टोल नाके, एसटी स्थानके येथेही लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.