Breaking News

पश्‍चिम रेल्वेवर 15 डब्यांच्या गाड्या वाढवणार


मुंबई, प्रतिनिधी, दि. 19 -  भावेश नकाते अपघात प्रकरणानंतर पश्‍चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील गर्दी टाळण्याच्या उपायांचा आढावा घेणार्‍या दोन समिती केंद्र सरकारने स्थापन केल्या होत्या. यापैकी पश्‍चिम रेल्वेच्या समितीने काही तातडीच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यानुसार आता पश्‍चिम रेल्वेवर 15 डब्यांच्या गाडयांची संख्या वाढवण्यात येणार आहे. सध्या पश्‍चिम रेल्वेवर 15 डब्यांच्या दोन गाडया धावतात. ही संख्या टप्प्याटप्प्याने वाढवणार असून त्यापैकी पहिली गाडी येत्या महिन्याभरात पश्‍चिम रेल्वेवर दाखल होईल.
दररोज सरासरी 75 लाख प्रवाशांची वाहतूक करणार्‍या मुंबईच्या उपनगरीय गाडयांमधील गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवणारी समिती रेल्वे मंत्रालयाने स्थापन केली होती.  पश्‍चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेमार्गासाठी दोन समित्या स्थापन झाल्या होत्या. या दोन्ही समित्यांनी डिसेंबर महिन्यात बैठका घेऊन  31 डिसेंबपर्यंत आपला अहवाल सादर करणे आवश्यक होते. पश्‍चिम रेल्वेवरील समितीने अहवाल सादर केला असून त्यात अपघाती मृत्यूंची कारणे, जास्त मृत्यू होण्याची वेळ, ठिकाणे आदी गोष्टींचा समावेश आहे. या कारणांबरोबरच मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजनांवरही भर देण्यात आला आहे. या समितीने दीर्घकालीन आणि तातडीच्या अशा दोन्ही प्रकारच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. दीर्घकालीन उपाय पूर्ण होण्यासाठी वेळही प्रचंड लागणार असल्याने तातडीच्या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. पश्‍चिम रेल्वेमार्गावर  15 डब्यांच्या गाडयांची संख्या वाढवावी, असेही या समितीने सुचवले आहे.
मध्य रेल्वे मार्गावर 40 लाख प्रवासी प्रवास करत असून पश्‍चिम रेल्वे मार्गावर 35 लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना सुविधा देण्याची रेल्वे प्रशासनाची असली, तरी काही जबाबदा-या प्रवाशांच्याही आहेत. मात्र वाढती गर्दी लक्षात घेता दोन्ही मार्गावर 15 डब्यांच्या लोकल वाढवण्याचा विचार असून त्यासाठी हालचाली सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.