पाकिस्तानच्या क्वेटामध्ये पोलियो कॅम्पमध्ये बॉम्बस्फोट, 14 जणांचा मृत्यू
क्वेटा, 13 - पाकिस्तानातील क्वेटा शहर बुधवारी सकाळी एका शक्तीशाली बॉम्बस्फोटाने हादरले. ’सॅटेलाइट टाउन’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पोलियो कॅम्पमध्ये हा स्फोट झाला. स्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत.
जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी 9 वाजेदरम्यान स्फोट झाला. घटनास्थळी पोलिस व बचाव पथक पोहोचले आहे. दहशतवाद्यांनी पोलिओ सेंटरला टार्गेट केले आहे. पोलिओ कॅम्पचा आज शेवटचा दिवस होता. ब्लूचिस्तान व क्वेटा शहरात पोलिओ कॅम्पची सुरुवात सोमवारी झाली होती. कॅम्पच्या माध्यमातून 50 लाख बालकांना डोस दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
