Breaking News

जेसीबीच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न

परभणी, दि. 06, ऑक्टोबर - वसमत रोडवरील एमआयडीसी परिसरात इंडिया बँकेच्या शेजारीच असलेले एटीएम मशीन जेसीबी मशीनच्या साह्याने फोडण्याचा  प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. आज पहाटे 3 ते 3.30 वाजेच्या सुमारास घडलेली ही घटना सकाळी निदर्शनास आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले व तपास  सुरू केला आहे़ गुरुवारी पहाटे चोरट्यांनी याच परिसरात खानापूर फाटा येथे घराच्या बाहेर लावलेली जेसीबी मशीन चोरून एटीएम केंद्रासमोर आणली. या ठिकाणी  सुरुवातील जेसीबीच्या सहाय्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर चोरट्याने सोबत आणलेली तार एटीएम केंद्रातील मशीनच्या लॉकर असलेल्या बॉक्सला  बांधून ती जेसीबीच्या सहाय्याने ओढून मशीन फाडेण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉकर तोडत असताना फक्त लॉकरचे हँडल तुटले़. त्यामुळे चोरट्याचा प्रयत्न फसला़  एटीएम केंद्राच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे  उपनिरीक्षक व्ही़बी़ श्रीमनवार यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले.